धाराशिवमध्ये २४ जानेवारी राेजी ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा; प्रमुख वीस नेते येणार
By बाबुराव चव्हाण | Published: January 15, 2024 04:58 PM2024-01-15T16:58:33+5:302024-01-15T16:59:59+5:30
ओबीसींना स्थानिक राजकारणातून संपविण्याचे कारस्थान
धाराशिव : सकल ओबीसी समाजाच्या वतीने २४ जानेवारी राेजी धाराशिव शहरात महाएल्गार मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सुमारे २० प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अर्जुन सलगर, ॲड. खंडेराव चाैरे, सचिन शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत साेमवारी दिली. वंचित बहुजन आघाडीनेही यासाठी पाठिंबा दिल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
मंडल आयाेगाची संपूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ४०० पेक्षा अधिक जातींचा समावेश असलेल्या ओबीसींवर प्रचंड अन्याय हाेत आहे. १२७ वी घटनादुरुस्ती झाली नसल्याचे दर्शवून स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आणण्याचा प्रयाेग राज्य सरकारने करून पाहिला आहे. या माध्यमातून ओबीसींना स्थानिक राजकारणातून संपविण्याचे काम सुरू आहे, असा आराेपही या पत्रकार परिषदेत केला. यापूर्वी १७ जानेवारी राेजी मेळावा घेण्यात येणार असे जाहीर करण्यात आले हाेते.
परंतु, नियाेजनाअभावी मेळावा पुढे ढकलण्यात आला. आता सकल ओबीसी समाजाच्या वतीने २४ जानेवारी राेजी महाएल्गार मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ, ॲड. बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश शेंडगे, टी. पी. मुंडे यांच्यासह २० प्रमुख नेते उपस्थित राहतील, असे पत्रकार परिषदेत अर्जुन सलगर, ॲड. खंडेराव चाैरे, सचिन शेंडगे यांनी सांगितले. यावेळी पाेपट माळी, अरुण जाधवर, कल्याण कुंभार, बालाजी वगरे आदींची उपस्थिती हाेती.