दुसऱ्या माळेला झाली देवीच्या शिवकालीन दागिन्यांची विशेषालंकार पूजा
By चेतनकुमार धनुरे | Published: October 16, 2023 02:44 PM2023-10-16T14:44:41+5:302023-10-16T14:45:40+5:30
सकाळी ६ ते १० या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती करण्यात आली.
धाराशिव : श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवाला रविवारी घटस्थापनेने सुरुवात झाल्यानंतर सोमवारी दुसऱ्या माळेला शिवकालीन दागिन्यांची विशेषालंकार पूजा बांधण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी आई राजा उदे उदेचा गजर करीत देवीचे दर्शन घेतले.
सोमवारी सकाळी ६ ते १० या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे विविध नियमित धार्मिक विधी पार पाडण्यात आले. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, देवीच्या विविध रुपातील अलंकार पूजेस सुरुवात झाली असून, १८ ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा होणार आहे.
१९ रोजी ललीत पंचमीनिमित्त मुरली अलंकार महापूजा, २० रोजी शेषशाही अलंकार महापूजा, २१ रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा व २१ रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे. दरम्यान, पहिल्या माळेचे औचित्य साधून रविवारी रात्री देवीची अश्व या वाहनावरुन मंदिर परिसरात छबिना मिरवणूक काढण्यात आली. संभळाच्या कडकडाटात यावेळी भाविकांनी देवीचा जयघोष केला. उपस्थित आराधी, गोंधळी, सेवेकरी, पुजारी यांनी पोत ओवाळून देवीचे दर्शन घेतले.