शस्त्रक्रियेसाठी एका दिवसात जमली लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:35 AM2021-09-25T04:35:10+5:302021-09-25T04:35:10+5:30

जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील गरीब कुटुंबातील मुलाच्या ब्रेनट्युमर शस्त्रक्रियेसाठी करण्यासाठी सरपंचांनी समाजमाध्यमाद्वारे मदतीचे आवाहन केले होते. यास ...

One lakh help in one day for surgery | शस्त्रक्रियेसाठी एका दिवसात जमली लाखाची मदत

शस्त्रक्रियेसाठी एका दिवसात जमली लाखाची मदत

googlenewsNext

जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील गरीब कुटुंबातील मुलाच्या ब्रेनट्युमर शस्त्रक्रियेसाठी करण्यासाठी सरपंचांनी समाजमाध्यमाद्वारे मदतीचे आवाहन केले होते. यास जेवळीकरांनी मोठा प्रतिसाद देत एका दिवसात लाखावर रक्कम जमा करून माणुसकीचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे, अजूनही मदतीचा ओघ सुरूच आहे.

तीस वर्षांपूर्वी कामाच्या शोधात मुंबईहून कुमार कनोजी (उत्तर प्रदेश) यांचे कुटुंब जेवळी येथे कामासाठी आले. हे पती-पत्नी गावातील झोपडपट्टीत इस्त्रीचा व्यवसाय करून आपली उपजीविका भागवू लागले. पुढे त्यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी अपत्य झाली. भूकंपानंतरही या कुटुंबाने गावाकडे परत न जाता जेवळी गावातच राहणे पसंत केले. पंधरा वर्षांपूर्वी कुमार कनोजी यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा सांभाळ करीत आहेत. मुलेही प्रपंचासाठी मिळेल ती कामे करून हातभार लावत आहेत. श्री बसवेश्वर काॅलेजमध्ये बारावीच्या परीक्षेत सर्वप्रथम आलेला मुलगा रविकुमार हा गावातील एका वकिलाकडे काम करतो.

सर्व काही सुरळीत चालले असतानाच रविकुमारला गेल्या महिन्यापासून पायाला मुंग्या येण्यास सुरुवात झाली. अनेक डॉक्टरांना दाखवून वेगवेगळ्या प्रकारचे उपचारही घेतले. परंतु, गुण येत नव्हता. अखेर, सोलापूर येथील रुग्णालयात त्याला ‘ब्रेन ट्यूमर’ झाल्याचे निदान झाले. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने एवढे महागडे उपचार घेणे शक्य नव्हते. तरीही तेथील डाॅक्टरांनी परिस्थिती पाहून एक शस्त्रक्रिया मोफत केली. मात्र, इतर उपचारासाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च सांगितला आहे. शिवसेना तालुकाप्रमुख तथा जेवळीचे सरपंच मोहन पणुरे यांनी प्रत्यक्षात दवाखान्यात जाऊन भेट घेऊन माहिती घेतली. या गरिबांच्या उपचारासाठी त्यांनी समाज माध्यमाद्वारे मदतीचे आवाहन केले. सरपंचाच्या या भावनिक आवाहनाला जेवळीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. मंगळवारी दुपारी आवाहन केल्यानंतर बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत खात्यात ८९ नागरिकांनी तब्बल १ लाख ३१ हजार रुपये जमा केले. विशेष म्हणजे, ही रक्कम प्रत्येकानी त्यांच्या खात्यात जमा करून त्याचे स्क्रीन शॉट काढून ग्रुपवरती पाठवले. जेवळीकरांनी अतिशय उर्त्स्फूततेने मदत करून माणुसकीचे दर्शन दिले आहे.

चौकट......

या मुलांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. जेवळी गावचा प्रथम नागरिक म्हणून शक्य तितकी मदत आम्ही केली आहे. तरीही आणखीन मदतीची गरज असल्याने समाज माध्यमाद्वारे मदतीसाठी आवाहन केले. याला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेकजण भविष्यातही अशा उपक्रमास मदत करण्यासाठी तयार आहेत. परिस्थितीचे गांभीर्य आणि सत्यता पाहून नागरिकांनी मदत केली आहे.

- मोहन पनुरे, सरपंच जेवळी.

वर्गमित्राच्या सहकार्याने व पुणे येथे असलेल्या अनेकांना संपर्क साधून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेकजण फोन करून मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

- प्रसाद पाटील, अभियंता पुणे

Web Title: One lakh help in one day for surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.