‘एकच मिशन, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण’; कळंबमध्ये मराठा महामोर्चाची तयारी जोरात
By बाबुराव चव्हाण | Published: September 16, 2022 05:19 PM2022-09-16T17:19:45+5:302022-09-16T17:20:17+5:30
कळंब येथे पंधरा दिवसांपासून सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य अशा मराठा मोर्चाचे आयोजन सुरू आहे.
कळंब (जि. उस्मानाबाद) -‘‘एकच मिशन, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण’’ असा नारा देत कळंब येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सोमवारी ‘‘मराठा महामोर्चा’’ आयोजीत करण्यात आला आहे. यासंबंधी मराठा समाजाच्या गावोगावी स्वयंस्फूर्तीने बैठका होत आहेत.
कळंब येथे पंधरा दिवसांपासून सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य अशा मराठा मोर्चाचे आयोजन सुरू आहे. याची तयारी अंतीम टप्यात आली आहे. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे अन् तेही ओबीसी प्रवर्गातील ५० टक्केच्या आतमधील आरक्षण द्यावे, अशी या आंदोलनातील प्रमुख मागणी आहे. यासाठी कोणत्याही राजकीय किंवा संघटनात्मक व्यासपीठाचा वापर न करता सकल मराठा समाजाने एकीची मूठ आवळत आरक्षण मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. यासाठी गावनिहाय समाजबांधवांच्या बैठका अंतिम टप्यात आल्या आहेत. मोर्चाची आचारसंहिता जाहीर करत, त्याविषयी गावबैठकात मोर्चात सहभागी होणार्यांना अवगत करण्यात आले आहे. १९ सप्टेंबर राेजी सकाळी १० वाजता विद्याभवन हायस्कूलच्या प्रांगणातून प्रांरभ झालेला मोर्चा नगर परिषद शाळेच्या प्रांगणात स्थिरावणार आहे. तद्नंतर पाच विद्यार्थीनी केवळ पाच मिनिटांचे प्रातिनिधिक भाषण करून उपविभागीय अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देणार आहेत. यापार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही सतर्क झाली असून आवश्यक त्या चोख व्यवस्थेचे नियोजन केले आहे.
अशी आहे मोर्चाची आचारसंहिता:
मोर्चा शांततेत, निश्चित केलेल्या मार्गानेच निघेल.
कोणत्याही पक्ष ,संघटना, व्यक्तींच्या विरोधात किंवा समर्थन घोषणा दिल्या जाणार नाहीत
प्रथम विद्यार्थिनी, तद्नंतर महिला, विद्यार्थी,सर्वसामान्य जनता व शेवटी राजकीय,संघटनेचे पदाधिकारी राहतील.
प्रत्येकास पोलीस, समन्वयक व स्वंयसेवकांच्या सूचनांचेे तंतोतंत पालन करावे लागेल.
सभास्थळी आल्यावर कोणत्याही बोलण्याची संधी मिळणार नाही. सर्वांना रांगेमध्येच चालावे लागेल.
ठराविकच घोषणा, त्यापण केवळ स्वंयसेवक देतील,त्यास सर्वांचा प्रतिसाद असेल.
मोर्चा सीसीटीव्ही, ड्रोनच्या निगरानीखाली असेल, गैरवर्तन दिसल्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल
अशी असेल पार्किंग व्यवस्था
येरमाळा, वाशी, बार्शी - पंचायत समिती समोरील पोलीस मैदान.
ढोकी, मुरूड, शिराढोण- केंब्रिज शाळा व मोहेकर क्रीडा संकुल डिकसळ
केज, आंबाजोगाई - रणसम्राट क्रिडागंण, १०१ नगर मैदान
भोगजी, नांदूर, आथर्डी- जि.प.कन्या प्रशाला मैदान
मोहा, खामसवाडी, येडशी-जि.प.मुलांची प्रशाला मैदान.