भावाच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा
By Admin | Published: January 6, 2017 08:53 PM2017-01-06T20:53:03+5:302017-01-06T20:53:03+5:30
पैशाच्या कारणावरून भावाचाच खून करणाऱ्यास उस्मानाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 6 - पैशाच्या कारणावरून भावाचाच खून करणाऱ्यास उस्मानाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना १३ आॅगस्ट २०१४ रोजी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारात घडली होती.
याबाबत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड़ महेंद्र देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारातील बालाजी अमाईन्स कंपनीच्या पुढे गंजेवाडी मार्गावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह १३ आॅगस्ट २०१४ रोजी आढळून आला होता़ याबाबत अभियंता मोहन काळे (रा़तामलवाडी) यांनी दिलेल्या माहितीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती़ पोलिसांच्या पाहणीदरम्यान मयताच्या शरीरावर चा कूने वार केल्याचे दिसून आले होते़ या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तामलवाडी पोलिसांनी मयताची ओळख पटविण्यासाठी सोलापूर पोलीस ठाणे गाठले़ त्यावेळी मयत इसम हा सोलापूर येथील मनोहर नगर झोपडपट्टी भागातील रहिवाशी असल्याचे समोर आले होते़पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाम विष्णू यादव (रा़ मित्रनगर शेळगी, सोलापूर) याने उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयात येवून मयताचे पार्थिव पाहिले़ त्यावेळी मयत इसम हा त्याचा भाऊ नामदेव यादव हा असल्याचे सांगत नातेवाईकांसह प्रेत ताब्यात घेवून गेला़ तपासादरम्यान शाम यादव यानेच १३ अॅगस्ट रोजी भाऊ नामदेव यादव याला तामलवाडी नजीकच्या गंजेवाडी मार्गावर आणून त्याचा खून केल्याचे समोर आले होते़ पैशाच्या कारणावरून हा खून केल्याचा कबुली जबाब शाम यादव याने पोलिसांच्या तपासात दिला होता़ या प्रकरणाच्या तपासाअंती उस्मानाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते़ या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व अतिरिक्त सरकारी वकिल महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक एक एस़आय़पठाण यांनी आरोपी शाम विष्णू यादव यास जन्मठेपीची शिक्षा सुनावली़ (प्रतिनिधी)