ऑनलाइन शिक्षण अन् मोबाइलने लावला मुलांना चष्मा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:25 AM2021-07-17T04:25:36+5:302021-07-17T04:25:36+5:30
उस्मानाबाद : मागील दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. या काळात कोराेना संसर्गापासून बचाव व्हावा, यासाठी वर्षभर ...
उस्मानाबाद : मागील दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. या काळात कोराेना संसर्गापासून बचाव व्हावा, यासाठी वर्षभर शाळा, महाविद्यालयांचा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू होता. परिणामी, मोबाइलच्या वापरामुळे अनेकांना डोळ्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. तर काही मुलांना चष्माही लागला आहे.
सध्या ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नसल्याने काही दक्षता घेऊन मुलांच्या हातात मोबाइल देणे गरजेचे आहे. मुलांच्या शारीरिक वाढीसाेबतच डोळ्यांची निगा राखणेही गरजेचे आहे, तसेच टीव्ही व मोबाइल यावर मुलांचा सर्वाधिक वेळ जातो. त्यातून मुलांमध्ये काही शारीरिक मर्यादा निर्माण होतात. ही स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक पालकाची धडपड सुरू आहे.
लहान मुलांना हे धाेके अधिक
मोबाइलच्या अतिवापरामुळे डोळे कोरडे होणे, जळजळ होणे असा त्रास होत आहे.
सलग काही तास नजर स्थिर राहत असल्याने डोळ्याचे स्थायू दुखतात.
वाकून बघत असल्याने मानेवरही ताण वाढतो तर पाठदुखीचा त्रास जाणवू लागतो.
ऑनलाइन असताना मुले सलग काही तास एकाच जागेवर बसतात, त्यामुळे पोटदुखी होऊ शकते.
पालकही चिंतेत
माझी एक मुलगी इयत्ता दुसरी, एक मुलगा इयत्ता ७ वी व दुसरा मुलगा ९ वीच्या वर्गात शिकत आहे. कोरोना संसर्गामुळे वर्षभरापासून ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. मोबाइलवर दिवसातील ४ ते ६ तास मुले असतात. त्यामुळे डोळ्यांच्या समस्याही जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे मुलांना दहा ते पंधरा मिनिटांचा ब्रेक दिला जात आहे.
सचिन वाघमारे, पालक.
सध्या मोबाइलवरच शिक्षण सुरू असल्याने मुलांचे मोबाइलचे प्रमाण वाढले आहे. मोबाइलवरच अभ्यास किंवा प्रश्नपत्रिका पाठविल्या जात असल्याने ते वाचताना मुलांना त्रास होतो. लहान अक्षरे वाचताना डोळ्यांना अधिक ताण येतो. त्यामुळे डोळे
दुखण्याचे प्रमाण वाढत आहे. शाळेत जे करून घेतले जाते, तेवढा फायदा ऑनलाइन शिक्षणामुळे होत नाही. मच्छिद्र क्षीरसागर, पालक
ऑनलाइन वर्गाचा अतिरेकी वापर टाळा
कोरोना संसर्गामुळे ऑनलाइन पद्धतीने मुलांचा अभ्यासक्रम घेतला जात आहे. सध्या दुसरा कोणता पर्याय नाही. आनलाइन अभ्यासक्रम करताना मुले ६ ते ८ तास एकाच जागेवर बसून असतात. स्क्रिनिंगचा वेळ वाढल्याने डोळ्यांच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा अतिरिक वापर टाळून त्याला वेळ निश्चित करावी.
डॉ. महेश पाटील, नेत्रतज्ज्ञ.
लहान मुलांमध्ये डोकेदुखी वाढली
१ मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर सतत बघितल्याने डोळ्याच्या स्नायूमध्ये फटी येते. याचा परिणाम गंभीर आहे.
२ डोळ्यांची पूर्ण हालचाल होत नाही. त्यामुळे डोळ्यातील पाणी कमी होते. काेरड्या डोळ्यात संसर्ग होतो.
३ डोकेदुखी व मानदुखीमुळे मुलांचे अभ्यासातून लक्ष उडते. त्यांच्या खानपानावरही या व्याधीचा परिणाम होतो.