ऑनलाईन एज्युकेशनची मदार गुरुजींच्या माेबाईल ‘डेटा’वरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:40+5:302021-07-09T04:21:40+5:30

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक मिळून जवळपास १ हजार ८९ शाळा चालविल्या जातात. या ...

Online education only on Madar Guruji's mobile 'Data' | ऑनलाईन एज्युकेशनची मदार गुरुजींच्या माेबाईल ‘डेटा’वरच

ऑनलाईन एज्युकेशनची मदार गुरुजींच्या माेबाईल ‘डेटा’वरच

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक मिळून जवळपास १ हजार ८९ शाळा चालविल्या जातात. या शाळेतून धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही साधारपणे लाखाच्या घरात आहे. मागील दीड ते दाेन वर्षांपासून काेराेनाचे संकट पाठ साेडायला तयार नाहीत. या संकटामुळे इतर क्षेत्रांसाेबतच शिक्षणक्षेत्राचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शाळा उघडण्यात आल्या असल्या तरी वर्गखाेल्या अन् बाकडेही रिकामेच आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्याचे शासनाकडून निर्देशित केले आहे. त्यानुसार ज्ञानदान करण्यात येत आहे. परंतु, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकाही शाळेकडे अधिकृत इंटरनेट कनेक्शन नाही. त्यामुळे आजघडीला तरी ऑनलाईन शिक्षणाची मदार पूर्णत: गुरुजींच्या माेबाईलमधील डेटापॅकवरच अवलंबून आहे. अशा विदारक स्थितीत ऑनलाईन शिक्षणाची ‘स्पीड’ वाढणार तरी कशी, असा प्रश्न सर्वसामान्य पालकांसह शिक्षणप्रेमींना पडू लागला आहे.

चाैकट...

खासगी माध्यमिकमध्येही नाही वेगळे चित्र...

जिल्हा परिषद शाळांतील इंटरनेट कनेक्शनची वस्तुस्थिती पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाला आत्मचिंतन करायला भाग पाडणारी आहे. असे असतानाच दुसरीकडे खासगी माध्यमिक शाळांतही फारशी वेगळी स्थिती नाही. काही बाेटावर माेजण्याइतपत शाळा साेडल्या तर उर्वरित शाळांमध्ये अधिकृत इंटरनेट कनेक्शनचा पत्ता नाही. त्यामुळे अशा शाळांतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण गुरुजींच्या माेबाईल डेटावरच निर्भर आहे.

ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय असते रे भाऊ?

माझ्या बाबाकडे माेठ्या काचेचा माेबाईल नाही. त्यावर केवळ फाेन येताे आणि दुसऱ्यांना लावता येताे. इंटरनेट चालत नाही. त्यामुळे मी माझ्या मित्राच्या घरी जावून त्याच्या बाबाच्या माेबाईलच्या सहाय्याने शिक्षण घेताे. माेबाईल नसलेल्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेत आहे.

-सचिन कदम, विद्यार्थी.

आमच्या घरी माेबाईल आहे. बाबा इंटरनेटचे पैसे भरतात. परंतु, स्पीड नसल्याने आमच्या शिक्षणात अडचणी येत आहेत. त्यामुळे शाळेत इंटरनेटची सुविधा असतील तर आमच्या अडचणी काहीप्रमाणात दूर झाल्या असत्या.

-विजय नाईक, विद्यार्थी.

सेसमधून व्हावी तरतूद

जिल्हा परिषद शाळेत गाेरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. काेराेनाचे संकट कधी सरेल हे काेणीच सांगू शकत नाही. त्यामुळे यापुढे आपणाला ऑनलाईन शिक्षणाची सवय ठेवावी लागणार आहे. यासाठी सर्व शाळांना सेस फंडातून अधिकृत इंटरनेट कनेक्शन देण्यात यावे.

- महेंद्र धुरगुडे, गटनेते, राष्ट्रवादी.

Web Title: Online education only on Madar Guruji's mobile 'Data'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.