पुस्तकांशिवाय भरली ऑनलाईन शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:51+5:302021-07-15T04:22:51+5:30
उमरगा : कोरोनामुळे गेल्या वर्षांपासून शाळा बंद आहेत. परंतु, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘शाळा बंद ...
उमरगा : कोरोनामुळे गेल्या वर्षांपासून शाळा बंद आहेत. परंतु, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘शाळा बंद शिक्षण चालू’ मोहिमेंतर्गत ऑनलाईन शिक्षण चालू केले. त्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली होती. यंदा, मात्र जून महिन्यात शैक्षणिक सत्र सुरू झाले. शाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी देखील शासनाने पाठ्यपुस्तके पुरविलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी निर्माण होत असून, शिक्षकांनाही पुस्तकांविना शिकवावे लागत आहे.
विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी व पालकांचा आर्थिक भार कमी व्हावा, यासाठी शासनाकडून मोफत पुस्तके दिली जातात. यंदा मात्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने शाळांकडून पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदवून घेतली ; परंतु पाठ्यपुस्तकांचा पुरवठा अद्याप केलेला नाही. शेजारच्या काही जिल्ह्यात गेल्या वर्षी वाटप करण्यात आलेली पाठ्यपुस्तके जमा करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या काही शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन पाठ्यपुस्तके जमा केली. परंतु, यासही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे जेवढी पुस्तके जमा झाली तेवढीच वाटप करण्यात आली आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांकडे अजूनही पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ऑनलाईनद्वारे शिक्षकांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनावर अभ्यास करावा लागत आहे.
वर्गनिहाय विद्यार्थी संख्या
पहिली -४,१९३
दुसरी -४,१३४
तिसरी -४,१८७
चौथी-४,३७९
पाचवी-४,३३८
सहावी -४,४१८
सातवी-४,३२९
आठवी-४,३४२
विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे
उस्मानाबाद जिल्हा परिषदेकडून विद्यार्थ्यांची जुनी पुस्तके जमा करून घेण्याविषयी शिक्षकांना कोणत्याही सूचना नव्हत्या. तसेच जुनी पुस्तके जमा करू नये, अशाही सूचना देण्यात आल्या नव्हत्या. काही शाळांनी इतर जिल्ह्यातील सूचना पाहून जुनी पुस्तके जमा केली व ती विद्यार्थ्यांना वाटप केली. पाठ्यपुस्तके पुन्हा शाळेकडे जमा करून जिल्हा परिषदेच्या काही विद्यार्थ्यांनी नवीन आदर्श निर्माण केला आहे. बालभारती कडून अद्याप पुस्तके मिळाली नाहीत. कधी मिळतील हे सांगता येत नाही.
-शिवकुमार बिराजदार, गटशिक्षणाधिकारी, उमरगा
काही विद्यार्थ्यांनी पुस्तके केली जमा
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील चांगली पुस्तके परत करण्याचे आवाहन करण्यात आले नव्हते. तरीही काही शिक्षकांनी इतर जिल्ह्यात पुस्तके जमा करण्याचा बातम्या पाहून पुस्तके जमा केली आहेत.
शिक्षक, मुख्याध्यापक तर्फे शाळेतील काही विद्यार्थ्यांशी व पालकांशी त्यासाठी संपर्क साधण्यात आला.
आदेश नसल्याने थोड्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्याकडील पुस्तके परत केली.
ही पुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली असून, त्यासाठी विद्यार्थ्यांचा ग्रुप करण्यात आला आहे.
पुस्तके नाहीत अभ्यास कसा करणार
पाचवी ते आठवीची सर्व पाठ्यपुस्तके दरवर्षी शासनाकडून शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मिळत होती. परंतु, यावर्षी अद्याप पाठ्यपुस्तके मिळालेले नाहीत. शाळेत मुख्याध्यापक व वर्ग शिक्षकांनी जुनी पाठ्यपुस्तके आम्हाला वाटप केलेली आहेत. त्यानुसार आम्ही नियमित ऑनलाईन अभ्यास पूर्ण करत आहोत.
- प्रतीक्षा मोरे, विद्यार्थिनी, जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा
मी इयत्ता पाचवी या वर्गात शिकत आहे. गेल्या दोन वर्षापासून लॉकडाऊन असल्यामुळे शाळेमध्ये जाता आले नाही. यावर्षी गेल्या वर्षातील जुनी व पाने फाटलेली पुस्तके मिळाली. नवीन पुस्तके अजून मिळाली नाहीत. गेल्यावर्षी पुस्तक मिळाल्यामुळे आम्ही घरात बसून आई-वडिलांकडून शिकत होतो. पण, यावर्षी पुस्तके नसल्यामुळे शिकणे अवघड झाले आहे.
- प्रणिता दिनकर पाटील, विद्यार्थिनी, माडज