तीन महिन्यात केवळ ३२ हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:25 AM2021-06-04T04:25:23+5:302021-06-04T04:25:23+5:30
कळंब : कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढल्याने लसीकरणावर भर दिला जात असला तरी कळंब तालुक्यात तीन महिन्यात लसीचे केवळ ...
कळंब : कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढल्याने लसीकरणावर भर दिला जात असला तरी कळंब तालुक्यात तीन महिन्यात लसीचे केवळ ३२ हजार ‘डोस’ देण्यात यश आले आहे. यामुळे एकूण पावणेदोन लाखांवर लोकसंख्येचा विचार करता सर्वांपर्यंत लसीचे ‘सुरक्षा कवच’ पोहचवण्यासाठी प्रशासनाला अद्याप मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.
कळंब तालुक्यात गतवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचे आगमन झाले. यानंतर कळंब शहरासह तालुक्यातील जवळपास सर्वच गावात कोरोनाचे पाऊल पडले. गावोगावी रुग्ण निघाल्याने पहिल्या लाटेत बाधितांच्या संख्येने दोन हजारांचा आकडा पार केला. यानंतर दोनेक महिने कोरोनाचा प्रसार थांबल्याने सुटकेचा निःश्वास टाकण्यात आला होता. यातून जनजीवन सुरळीत होत असतानाच मार्चमध्ये दुसऱ्या लाटेने पाय पसरण्यास सुरुवात केली. याची व्याप्ती एवढी मोठी होती की, प्रशासन हतबल झाले. आरोग्य यंत्रणा तोकडी ठरू लागली. गंभीर रुग्णांची संख्या वाढत जाऊन अनेकांचा बळी चालला. या स्थितीत कोरोनावर ‘सुरक्षा कवच’ ठरत असलेल्या लसी आल्या.
कोवॅक्सिन व कोविशिल्ड गावपातळीवर पोहचली. २७ जानेवारीपासून कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात तर १० मार्चपासून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रात नागरिकांना लसीकरण केले जाऊ लागले. यात पहिल्या टप्प्यात कोमॉरबीड व साठ वर्षांवरील ज्येष्ठांना, दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना तर तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वर्षाच्या तरुणांना लस देण्याचा निर्णय अंमलात आणला गेला. कळंब शहराची लोकसंख्या जवळपास २७ हजार आहे. याशिवाय ग्रामीण भागातील ९५ गावात एक लाख ७५ हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. एकूणच तालुक्याची दोन लाखांवर लोकसंख्या असताना आजवर केवळ ३२ हजार १०७ लसीचे डोस झाले आहेत. यात पहिल्या व दुसऱ्या डोसधारकांचा दुबार आकडा वजा केला तर लसीच्या कवच मिळालेल्या आकड्यात परक पडू शकतो. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण सुरू होऊन चार महिने तर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गतच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होऊन तीन महिने झाले तरी अद्यापपर्यंत केवळ दहा ते पंधरा टक्के लोकसंख्येलाच लस मिळाली असल्याने प्रशासनाला मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.
चौकट....
उपजिल्हा रुग्णालयाने कापला दहा हजारांचा पल्ला
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात आजवर एकूण १२ हजार ४४० लसीचे डोस टोचण्यात आले आहेत. यात ८ हजार ६०७ डोस पहिले आहेत तर ३ हजार ४३३ डोस दुसरे आहेत. यातही कोविशिल्डचा वरचष्मा असून त्यांचे ७ हजार ३९३ तर कोवॅक्सिनचे ४ हजार ६४७ डोस झाले आहेत. यामध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना दहा हजारांच्या आसपास डोस दिले असल्याचे असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी सांगितले.
ग्रामीण भागात १९ हजार डोस
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय ग्रामीण भागात लसीकरणाचा कार्यक्रम राबवत आहे. मागच्या तीन महिन्यात यासाठी सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या अरोग्य उपकेंद्रात लसीकरणाचे एकूण १५८ सेशन्स झाले आहेत. यामध्ये एकूण १९ हजार ६६७ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यात अधिकांश लोक ज्येष्ठ नागरिक आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीपकुमार जाधव यांनी सांगितले.
तरुणाई पुन्हा ‘वेटिंग’वर
मध्यंतरी १८ ते ४४ वयोगटातील तरुणांना लसीकरणास अनुमती देण्यात आली होती. यासाठीच्या ऑनलाइन प्रक्रियेत तरुण दिवस-दिवस व्यस्त असत. यातून संधी प्राप्त झालेल्या दोनेक हजार तरुणांना लस मिळाली आहे. परंतु, बाकी तरुणाई सध्या वेटिंगवरच दिसून येत आहे.