ग्रामसेवकांकडून मिळणार केवळ बेबाकी प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:28 AM2020-12-24T04:28:22+5:302020-12-24T04:28:22+5:30
भूम : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी २४ डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे. त्यासाठी गाव पातळीवरील पुढारी कागदपत्रांची जमवाजमव करण्याच्या ...
भूम : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी २४ डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे. त्यासाठी गाव पातळीवरील पुढारी कागदपत्रांची जमवाजमव करण्याच्या तयारीला लागले आहेत. परंतु, ग्रामसेवकांकडून केवळ थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र मिळणार असून, इतर कागदपत्रांऐवजी उमेदवारांचे स्वयंघोषणापत्र स्वीकारावे, असे निवेदन ग्रामसेवक संघटनेने प्रशासनाला दिले आहे.
ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी थकबाकी तसेच अतिक्रमण नसल्याचे प्रमाणपत्र, अपत्य दाखला, शौचालय असल्याचा दाखला आदी कागदपत्रांची आवश्यकता असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. मात्र, ग्रामसेवकांनी उमेदवारांना केवळ थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र देऊ. इतर तीन कागदपत्रांसाठी शासन निर्णयाप्रमाणे स्वयंघोषणापत्र स्वीकारावे, असे या निवेदनात म्हटले आहे. तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे व गटविकास अधिकारी ढवळशंख यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटना अध्यक्ष एस. एम. बनसोडे, उपाध्यक्ष बालाजी चौधरी, एस. एस. बारस्कर, आर. जी. हुंबे, गिरीष कुलकर्णी, एस. एस. शिंदे, ग्रामसेविका हराळ व जानराव उपस्थित होते.