महायुतीत फक्त उस्मानाबादचा पेच, महाविकास आघाडीत तीन जागा अधांतरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 07:20 PM2024-10-22T19:20:08+5:302024-10-22T19:22:17+5:30

बंडखोरी टाळण्यासाठी ठरलंही असेल; पण जाहीर होईना

Only Osmanabad's embarrassment in the Mahayuti, three seats not decided in Mahavikas aghadi | महायुतीत फक्त उस्मानाबादचा पेच, महाविकास आघाडीत तीन जागा अधांतरी

महायुतीत फक्त उस्मानाबादचा पेच, महाविकास आघाडीत तीन जागा अधांतरी

धाराशिव : उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झालेले असतानाही अद्याप महायुती व आघाडीतील जागा जाहीर झाल्या नाहीत. धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद विधानसभा आघाडीकडून क्लिअर असली तरी महायुतीसमोर या एकमेव जागेचा पेच आहे. यामुळे येथील प्रतिस्पर्धी अजून ठरला नाही. दुसरीकडे उर्वरित तीनही मतदारसंघाबाबत आघाडीकडून जागा कोणाची, हे जाहीर करण्यात आले नाही. यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे.

भाजपने रविवारी पहिली यादी जाहीर केली. त्यात तुळजापूरच्या जागेची घोषणा करण्यात आली असून, विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. दुसरीकडे उद्धवसेनेने उस्मानाबादमधून विद्यमान आमदार कैलास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून, घोषणा औपचारिकता बाकी आहे. या दोन जागांवर प्रत्येकी एक उमेदवार ठरला आहे; मात्र त्यांचा प्रतिस्पर्धी अजून ठरलेला नाही. उस्मानाबादच्या जागेसाठी महायुतीतून तिन्ही मित्रपक्षांची रस्सीखेच सुरू आहे. यामुळे ही जागा कोणाच्या पदरात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंडा व उमरग्याच्या जागेबाबत निश्चिती असून, या दोन्ही जागा शिंदेसेना लढू शकते. इकडे महाविकास आघाडीने मात्र, तिन्ही जागांचा सस्पेन्स कायम राखला आहे. परंड्यात राष्ट्रवादी व शिवसेनेत (ठाकरे) चुरस आहे. तुळजापुरात आघाडीतील तिन्ही पक्ष आग्रही आहेत. उमरग्यात काँग्रेस व उद्धवसेनेत चुरस दिसते आहे. त्यांचा निकाल अजूनही लागल्याने उत्कंठा ताणली गेली आहे.

उस्मानाबादमध्ये चाललंय काय ?
उस्मानाबादमधून सर्वाधिक इच्छुकांची गर्दी शिंदेसेनेकडे जमली आहे. काही दिवसांपूर्वीच्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन ते चार इच्छुकांना बगलेत घेऊन गोंजारल्याने सगळेच आपली उमेदवारी फिक्स असल्याचे समजून कामाला लागले आहेत. दुसरीकडे सावंत कंपनीही मतदारसंघाचा अदमास घेत आहेत. भाजपचे इच्छुक मुंबईत तळ ठोकून आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादीही तयारी करीत आहे.

परंड्याबाबत शिवसैनिक आग्रही...
आघाडीकडून परंड्याचा पेच अजूनही सुटला नाही. येथून उद्धवसेनेचे माजी आ. ज्ञानेश्वर (तात्या) पाटील तयारीत होते; मात्र त्यांच्या अकस्मात निधनानंतर पोकळी निर्माण झाली. यामुळे ही जागा शरद पवार गटाकडे सरकण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर शिवसैनिकांनी दिवंगत तात्यांचे पुत्र रणजित यांना समोर करून मुंबईत तळ ठोकला आहे. त्यांचे प्रयत्न किती फळतात, हे लवकरच कळेल.

Web Title: Only Osmanabad's embarrassment in the Mahayuti, three seats not decided in Mahavikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.