खेळखंडोबा... केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनाच मिळाली नाही कॅल्शियमची गोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 06:19 AM2022-12-02T06:19:59+5:302022-12-02T06:20:17+5:30
अनुभवला आरोग्य सेवेचा खेळखंडोबा
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी उस्मानाबादेत आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी अचानक जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी औषधीसाठीच्या रांगेत स्वत: थांबून त्यांनी एका रुग्णाची चिठ्ठी दिली. मात्र, त्यातील कॅल्शियमची गोळी उपलब्ध नसल्याचे सांगून ती त्यांना बाहेरून घेण्याचा सल्ला देण्यात आला. यावर मंत्री पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
डॉ. पवार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षाकडे जात असताना त्यांना औषधी कक्षापुढे गर्दी दिसली. मग त्यांनी रांगेतील एका रुग्णाची चिठ्ठी आपल्याकडे घेतली व रांगेत स्वत: थांबल्या. जवळपास १० मिनिटांनी त्याचा नंबर आला. त्यांनी खिडकीतून चिठ्ठी दिली असता आतून फार्मासिस्टने कॅल्शियमची गोळी उपलब्ध नसल्याचे सांगितले. तसेच ही गोळी बाहेरून घेण्याचा सल्लाही दिला.
औषधांची केली व्यवस्था
यावर नाराजी व्यक्त करत तात्पुरती औषधींची व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून करून घेण्याची सूचना केली.
जिल्हा सामान्य रुग्णालय मेडिकल कॉलेजकडे वर्ग झाले आहे. मात्र, मान्यता मिळून एकच महिना झाला. यामुळे अद्याप बरेचसे हेड तयार न झाल्यामुळे निधीची अडचण आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.
-डॉ. उज्ज्वला गवळी, अधिष्ठाता