ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड कार्यान्वित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:35 AM2021-05-08T04:35:04+5:302021-05-08T04:35:04+5:30
मुरुमः शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन बेडची सुविधा तत्काळ कार्यान्वित करावी, अन्यथा मंगळवारपासून रुग्णालयासमोर उपोषण ...
मुरुमः शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन बेडची सुविधा तत्काळ कार्यान्वित करावी, अन्यथा मंगळवारपासून रुग्णालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मुरुम ग्रामीण रुग्णालयात २५ ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, तज्ज्ञ फिजिशियन तसेच इतर साधनसामग्री नसल्याने कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालय प्रशासन जबाबदारी घेत नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयातील राखीव १० पैकी ५ जम्बाे सिलिंडर तुळजापूर येथे, तर दाेन उमरग्याला पाठविण्यात आले आहेत. मुरुमच्या ग्रामीण रुग्णालयात शहर व परिसरातील २० ते २५ गावांतील रुग्ण उपचारासाठी येत असतात. गंभीर रुग्णांना उपचारासाठी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. मात्र, उमरगा येथे ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. त्यामुळे मुरुम ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची तांत्रिक बाबी दूर करून सुविधा कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. ऑक्सिजन बेडअभावी रूग्णांची हेळसांड थांबवावी, अन्यथा मंगळवारपासून उपाेषण केले जाईल, असा इशारा भाजप व राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे. निवेदनावर भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिणियार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, शहराध्यक्ष बाबा कुरेशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.