उस्मानाबादेत आजपासून नाट्यमहोत्सवाची धूम !
By Admin | Published: April 15, 2017 09:30 PM2017-04-15T21:30:44+5:302017-04-15T21:32:54+5:30
उस्मानाबाद : येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर ‘आॅल दी बेस्ट’ या सुप्रसिध्द विनोद नाटकाने रविवारी नाट्यमहोत्सवास शुभारंभ होत आहे.
उस्मानाबाद : येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर ‘आॅल दी बेस्ट’ या सुप्रसिध्द विनोद नाटकाने रविवारी नाट्यमहोत्सवास शुभारंभ होत आहे. माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते १६ ते २० या कालावधीत होणाऱ्या नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर तुळजाभवानी क्रीडा संकुलावर उभारण्यात आलेल्या मुख्य रंगमंचावर मुख्य नाट्यमहोत्सवास प्रारंभ होईल.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने १६ ते २० एप्रिल या कालावधीत उस्मानाबादकरांसाठी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात देशभरात गाजलेली विविध व्यावसायिक नाटके आणि दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. रविवारी सायंकाळी ६ वाजता माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे. आ. मधुकर चव्हाण हे अध्यक्षस्थानी असणार आहेत, तर खासदार प्रा. रवींद्र गायकवाड आणि ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत नाडापुडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमास आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. राहुल मोटे, आ. ज्ञानराज चौगुले, आ. बसवराज पाटील, आ. दिलीपराव देशमुख, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. तानाजी सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि नाट्यपरिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांची उपस्थिती राहणार आहे. उद्घाटनानंतर मुख्य रंगमंचावर ‘आॅल दी बेस्ट’ हे प्रसिध्द विनोदी नाटक सादर केले जाणार आहे. रविवारपासून सुरु होणाऱ्या या पाच दिवसांच्या नाट्यमहोत्सवास जिल्हाभरातील नाट्यरसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. सुजितसिंह ठाकूर, कार्याध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, निमंत्रक धनंजय शिंगाडे, नाट्यपरिषदेचे शाखाध्यक्ष विशाल शिंगाडे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)