उस्मानाबादेत ७० छावण्यांमध्ये ४६ हजारावर पशुधन दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 06:48 PM2019-04-20T18:48:38+5:302019-04-20T18:50:24+5:30

पाण्यासोबतच चाऱ्याचेही दुर्भिक्ष्य

In Osmanabad, 46 thousand animals are lives in 70 shelter | उस्मानाबादेत ७० छावण्यांमध्ये ४६ हजारावर पशुधन दाखल !

उस्मानाबादेत ७० छावण्यांमध्ये ४६ हजारावर पशुधन दाखल !

googlenewsNext
ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा तीव्र भूम तालुक्यामध्ये सर्वाधिक ३७ छावण्या सुरू

उस्मानाबाद : अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या ५० ते ५५ टक्के इतका अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे पिकेही हाती लागली नाहीत अन् भूजलस्तरही अपेक्षित प्रमाणात उंचावला नाही. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासोबतच चाऱ्याचेही दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यामुळे पशुधन जगावायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. पशुपालक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाने छावण्यांसाठी ८६ प्रस्ताव दाखल झाले होते. यापैकी ७० छावण्यांना मंजुरी दिली असून सुमारे ४६ हजार ३१४ एवढ्या पशुधनास आधार मिळाला आहे. 

पशुधनासाठीचा चारा आणि पाण्याचाही दुष्काळ निर्माण झाल्याने चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत होती. या मागणीसाठी काहीवेळा आंदोलनेही झाले. यानंतर शासनाकडून चारा छावण्यांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले असता दीडशे ते पावणेदोनशे प्रस्ताव दाखल झाले होते. या प्रस्तावांची छाननी केल्यानंतर आजघडीला ८६ प्रस्ताव पात्र ठरले आहेत. यापैकी ७० प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या छावण्यास सध्या सुरू झाल्या आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील आठ, उमरगा एक, भूम ३७, परंडा १७, कळंब ३ आणि वाशी तालुक्यात चार छावण्यांचा समावेश आहे. या सर्व छावण्यांमध्ये मिळून आजघडीला मोठी ४१ हजार ३०८ आणि लहान ५ हजार ६ एवढ्या पशुधनास आधार मिळाला आहे. दुष्काळाची दाहकता दिवसागणिक वाढू लागली आहे. त्यानुसार छावण्यांची आणि छावण्यांत दाखल होणाऱ्या पशुधनाची संख्याही वाढू लागली आहे. भविष्यात ही परिस्थिती आणखी गंभीर रूप धारण करेल, असे शेतकरी सांगतात.

कडब्याचे दर कडाडले
पावसाळ्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले. याचा फटका रबी हंगामातील पिकांना बसला. ज्वारीसारखी पिके अक्षरश: वाया गेली होती. त्यामुळे सध्या कडब्याची टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईची दाहकता विचारात घेऊन अनेक शेतकरी कडब्या विकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ज्यांच्याकडे पशुधन नाही, असे शेकरी कडबा विक्री करीत असले तरी एका पेंडीचा दर २५ ते ३० रूपये सांगत आहेत. येणाऱ्या काळात हे दर आणखी वाढतील !

३०० ते ३००० पशुधन...
छारा छावण्यांसाठी शासनाकडून वेगवेगळ्या अटीही घालण्यात आल्या आहेत. एका छावणीत कमित कमी ३०० आणि जास्तीत जास्त ३ हजार पशुधन बंधनकारक आहे. तीनशे पेक्षा कमी पशुधन असलेल्या छावण्यांना प्रशासनाकडून परवानगीही दिली जात नाही. याच निकषाच्या आधारे सध्या छावण्यांना मंजुरी दिली जात आहे. सदरील निकष पूर्ण न करणाऱ्या संस्थांचे प्रस्ताव प्रशासनाकडून नामंजूर करण्यात आले  आहेत. 


छावण्यांची संख्या वाढविणे गरजेचे 
माझ्याकडे लहान-मोठे मिळून  पंधरा ते वीस जनावरे आहेत. अत्यल्प पर्जन्यमानामुळे रबी हंगामातील पिके हाती लागली नाहीत. त्यामुळे कडबा निघण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे पशुधन जगवायचे कसे? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु, तालुक्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेता, छावण्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. गाव तिथे छावणी झाल्यास शेतकऱ्यांची सोय होईल.
-दादा आखरे, पशुपालक, भूम.

Web Title: In Osmanabad, 46 thousand animals are lives in 70 shelter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.