भुगर्भातील गूढ आवाजाने उस्मानाबाद जिल्हा हादरला; भूकंपाची नोंद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 05:32 PM2018-01-18T17:32:22+5:302018-01-18T17:34:05+5:30
शहरासह जिल्ह्याचा अर्ध्यापेक्षा अधिक भाग आज दुपारी भुगर्भातील जोरदार आवाजाने हादरला़ यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र लातूर येथील भूकंपमापक यंत्रावर याची कसलीही नोंद झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
उस्मानाबाद : शहरासह जिल्ह्याचा अर्ध्यापेक्षा अधिक भाग आज दुपारी भुगर्भातील जोरदार आवाजाने हादरला़ यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र लातूर येथील भूकंपमापक यंत्रावर याची कसलीही नोंद झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुपारी ३ वाजून ९ मिनिटाला मोठ्या आवाजासह हादरा जाणवला़ उस्मानाबाद, तुळजापूर, येणेगूर, मुरुम, उमरगा, लोहारा, नळदुर्ग, अणदूरसह कास्ती, भातागळी, माकणी, सास्तूर, वडगाव, जेवळी, पांढरी, करजगाव, माकणी, हिप्परगा रवा, मोघा, मार्डी, बेंडकाळ, कानेगाव, नागराळ बेलवाडी व इतरही अनेक गावांमध्ये हा प्रकार झाला़ घरावरील पत्रे, तावदाने भांडी गडगडल्याने काही नागरिक भुकंप झाल्याच्या समजाने रस्त्यावर आले़
भूकंपाची नोंद नाही
या संदर्भात लातूर येथील भूकंपमापक केंद्रातील मौसम वैज्ञानिक सुधीर हरहरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी केंद्रात भूकंपाची कसलीही नोंद झाली नसल्याचे स्पष्ट केले. तर उस्मानाबादचे वरिष्ठ भुवैज्ञानिक पी़एस़ पौळ यांनी भुगर्भातील हालचालींमुळे हा आवाज झाल्याचे सांगितले.