उस्मानाबाद जिल्ह्यात कुष्ठरूग्णांच्या संख्येत दहा टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 06:30 PM2018-09-25T18:30:22+5:302018-09-25T18:31:55+5:30
कुष्ठरोग शोध मोहिमेत मागील पाच वर्षात आढळून येणाऱ्या रूग्णसंख्येत तब्बल दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे़
- विजय मुंडे
उस्मानाबाद : जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कुष्ठरोग शोध मोहिमेत मागील पाच वर्षात आढळून येणाऱ्या रूग्णसंख्येत तब्बल दहा
टक्क्यांनी वाढ झाली आहे़ यातील ५७ जणांवर शासकीय योजनेतून मिरज येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत़ तर औषधोपचारामुळे कुष्ठरोग कमी
होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यांवर गेले आहे़.
जिल्ह्यातील कुष्ठरोगाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांची प्रशासनाकडून प्रत्येक वर्षी मोहीम राबवून तपासणी केली जाते़ यंदाची तपासणी मोहीम २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर या कालावधीत होत आहे़ कुष्ठरोगाचे निर्मुलन व्हावे, यासाठी शासनस्तरावरून अनेक योजना राबविण्यात येत आहे़
जिल्ह्यातील आकडेवारी पाहता मागील पाच वर्षात प्रत्येक वर्षी रूग्ण कुष्ठरूग्ण आढळून येण्याची संख्या वाढताना दिसत आहे़ सन २०१३-१४ मध्ये
जिल्ह्यात १४६ रूग्ण आढळून आले होते़ तर २०१४-१५ मध्ये १५३, २०१५-१६ मध्ये १७६, २०१६-१७ मध्ये २०१ तर २०१७-१८ मध्ये ३१९ कुष्ठरूग्ण आढळून आले आहेत
रूग्णांचे प्रमाण पाहता २०१३-१४ मध्ये ८़४१ टक्के, २०१४-१५ मध्ये ८़६९ टक्के, २०१५-१६ मध्ये ९़८४ टक्के, २०१६-१७ मध्ये ११़२४ टक्के तर २०१७-१८ मध्ये रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण १७़८४ टक्क्यांवर गेले आहे़ कुष्ठरूग्णांना कुष्ठरोग विभागाकडून विविध साहित्याचे वाटप केले जाते़ मागील पाच वर्षात रूग्णांना जखमा होऊ नयेत म्हणून वापरावयाच्या १९२१ चपलांचे वाटप करण्यात आले आहे़ तसेच १०२ चष्मे, रूग्णांनी स्वत: उपचार
घ्यावेत यासाठी १३९ किटचे वाटप करण्यात आले आहे़ चालू वर्षात प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत किती रूग्ण आढळून येतात? याकडे
लक्ष लागले आहे़
औषधोपचाराने आजार होतो दूर
अंगावरील न खाजविणारे, न दुखणारे चट्टे असतील तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे़ अशा नागरिकांना कुष्ठरोग असू शकतो़ चार पेक्षा कमी चट्टे असतील तर सहा महिने व चार पेक्षा जास्त चट्टे असतील तर एक वर्षभर औषधोपचार केले तर कुष्ठरोग दूर होतो़ नागरिकांनी न लाजता, चट्टे न लपविता ते डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावेत़
- डॉ़ बी़एसख़डके, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग)
तर होऊ शकते लागण
कुष्ठरोग असलेल्या आणि ज्या रूग्णाने औषधोपचार घेतलेले नाहीत, अशा रूग्णाचा अधिक काळ संपर्क आला तर कुष्ठरोगाची लागण होऊ शकते़
रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या नागरिकांना याची लागण होण्याची शक्यता अधिक असते़ कुष्ठरोगाच्या जंतुंनी शरिरात प्रवेश केला तर तीन ते पाच वर्षात शरिरावर कुठेही कुष्ठरोगाची लक्षणे दिसतात़ नवीन रूग्णांपैकी केवळ १० ते १५ रूग्ण सांसर्गिक (रोग पसरविणारे) असतात़ औषधोपचार घेणाऱ्या रूग्णांमुळे रोगाचा संसर्ग होण्याचे प्रमाण शून्य आहे़
कुष्ठरोगाची लक्षणे
त्वचा तेलकट, लालसर, जाडसर, सुजलेली दिसणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, सुजणे, भुवयांचे केस विरळ होणे, झडणे, अंगावर गाठी येणे, अंगावरील विविध ठिकाणी दिसणारे चट्टे ही कुष्ठरोगाची लक्षणे आहेत.