उस्मानाबाद जिल्ह्यातील दीड हजार दूध संस्था अवसायानात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 07:35 PM2019-01-17T19:35:14+5:302019-01-17T19:41:10+5:30

या सर्व संस्थांच्या माध्यमातून होणारे दूध संकलन अवघ्या १० हजारावर येऊन ठेपले आहे.

Osmanabad district's 1.5 thousand milk institution are in trouble | उस्मानाबाद जिल्ह्यातील दीड हजार दूध संस्था अवसायानात !

उस्मानाबाद जिल्ह्यातील दीड हजार दूध संस्था अवसायानात !

googlenewsNext
ठळक मुद्देदूध संकलनात मोठी घटजिल्ह्यात साठच संस्था सुरू

उस्मानाबाद : खाजगी दूध संकलकांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारल्यामुळे जिल्ह्यातील सहकारी दूध संस्था अडचणीत आल्या आहेत. अशा संस्थांवर अवसायक नेमण्याची नामुष्की ओढावली आहे. आजवर सुमारे दीड हजारावर संस्था अवसायनात निघाल्या आहेत. या सर्व संस्थांच्या माध्यमातून होणारे दूध संकलन अवघ्या १० हजारावर येऊन ठेपले आहे.

काही दशकांपूर्वी जिल्ह्यात सहकारी दूध संस्थांचे जाळे भक्कम होते. प्रतिदिन लाखो लिटर दूध संकलन या संस्थांद्वारे केले जात होते. या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधले जात असे. मध्यंतरीच्या काळात या व्यवसायात खाजगी संकलकांनी उडी घेतली. गावोगावी संकलन केंद्र सुरू केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी सहकारी संस्थांपेक्षा जास्त दर दिला जाऊ लागला. त्यामुळे शेतकरी खाजगी संकलन केंद्राकडे वळले. आणि याचाच फटका सहकारी दूध संस्थांना बसला. दूध संकलन जसजसे कमी-कमी होत गेले त्यानुसार संस्थांही अडचणीत येऊ लागल्या. आजघडीला जिल्हाभरातील थोड्याथोडक्या नव्हे, तर तब्बल १ हजार ५६८ सहकारी संस्था अवसायनात काढण्याची नामुष्की संबंधित कार्यालयावर ओढावली आहे.

यामध्ये भूम तालुक्यातील सर्वाधिक ३६४ संस्थांचा समावेश आहे. यानंतर परंडा तालुक्यातील ३२०, उस्मानाबाद ३११, तुळजापूर ५५, वाशी १३८, कळंब २३३, लोहारा ५४ आणि उमरगा तालुक्यातील ८५ संस्थांचा समावेश आहे. अवसायनात निघालेल्या संस्थांची संख्या लक्षात घेता सध्या केवळ साठच्या आसपास संस्था सुरू आहेत. या संस्थांकडून साधारपणे १० हजार लिटरच्या आसपास दूध संकलन केले जात आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा संस्थांना पुन्हा बळ देण्याची गरज आता दूध उत्पादकांतून व्यक्त होऊ लागली आहे.

साठच संस्था सुरू....
सहकारी दूध संस्थांना ना शासनाकडून प्रोत्साहन मिळत आहे ना सोयी सुविधा. त्यामुळे सदरील संस्थांच्या अडचणींमध्ये दिवसागणिक भर पडू लागली आहे. १ हजार ६२८ पैकी सुमारे १ हजार ५६८ संस्था अवसायनात निघाल्या आहेत. आजडीला केवळ ६० संस्था सुरू आहेत. यामध्ये उस्मानाबाद आठ, तुळजापूर दहा, परंडा सात, भूम सतरा, वाशी पाच, लोहारा पाच आणि उमरगा तालुक्यातील तीन संस्थांचा समावेश आहे. 

दूध संकलनात मोठी घट...
काही वर्षांपूर्वी भूम येथील शासकीय दूध योजनेच्या माध्यमातून प्रतिदिन सुमारे ५ लाख लिटर दूध संकलन होत असे. परंतु, साडेतीनशेवर संस्था अवसायनात निघाल्यामुळे हे संकलन आता अवघ्या सात ते आठ हजारावर आले आहे. उमरगा येथील योजनेतून प्रतिदिन ४ हजार लिटर दूध संकलन होत असे. सध्या हे प्रमाण पावणेतीन हजार लिटरपर्यंत खाली आले आहे. याचाही फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

Web Title: Osmanabad district's 1.5 thousand milk institution are in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.