‘एसटी’च्या उस्मानाबाद विभागाने वर्षभरात जमवला पावणेदोनशे कोटींचा गल्ला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 04:57 PM2019-04-25T16:57:30+5:302019-04-25T16:58:22+5:30
तब्बल सहा कोटी किलोमीटर केला प्रवास
उस्मानाबाद : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन शहरांसोबतच ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाअंतर्गत येणाऱ्या सहा आगारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. वर्षभरात एसटीने ६ कोटी १ लाख किलोमीटर रस्ता कापत सुमारे पावणेदोनशे कोटींचा गल्ला जमवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत गल्ल्यामध्ये दोन कोटींची जास्तीची भर पडली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस ही ग्रामीण भागातील दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे मागील काही दशकांच्या तुलनेत खाजगी प्रवासी वाहतुकीचे जाळे विस्तारले असले तरी महामंडळाच्या बसचे महत्व आणि उपायोगिता आजही कायम आहे. महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाअंतर्गत उस्मानाबाद, तुळजापूर, परंडा, भूम, कळंब आणि उमरगा हे सहा आगार येतात. या सर्वच आगारांकडून मागील दोन-तीन वर्षांपासून प्रवासी वाढविण्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे. प्रवास भाडे सवलत योजनाही राबविल्या जात आहेत. तसेच वातानुकुलित बससेवाही सुरू केली आहे.
या सर्व उपाययोजनांचा परिणाम म्हणून की काय, दुरावलेले प्रवासी पुन्हा महामंडळाच्या सेवेकडे वळू लागले आहेत. त्यानुसार ‘एसटी’च्या गल्ल्यातही भर पडू लागली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाअंतर्गत येणाऱ्या सहा आगारांच्या ३९६ बसेसने ५ कोटी ९२ लाख ६१ हजार किलोमीअर रस्ता कापत पावणेदोनशे कोटींचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, २०१८-१९ या आर्थिक वर्षात उस्मानाबाद विभागाच्या ताफ्यात नव्याने सहा गाड्या दाखल झाल्या. त्यामुळे बसेसची संख्या ४०२ वर जावून ठेपली. या सर्व बसेसने मिळून ६ कोटी १ लाख ५ हजार किलोमीटर प्रवास केला. यातून १६७४ कोटी १६ लाख ५२ हजार रूपये एवढे उत्पन्न मिळाले. २०१७-१८ च्या तुलनेत महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाच्या गल्ल्यात तब्बल दोन कोटींची जास्तीची भर पडली आहे. एवढे नाही तर बसेसने ८ लाख ४४ हजार किमीचा प्रवासही अधिक केला. उरोक्त आकडेवारी पाहता, कोणाला नसले आले तरी एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाला तर ‘अच्छे दिन’ आले, असे म्हटल्याच वावगे ठरणार नाही.
कोणी किती जमवला गल्ला?
उस्मानाबाद विभागातील तुळजापूर आगाराने ३७ कोटी ८६ लाख, उमरगा ३१ कोटी ७ लाख, भूम २४ कोटी १६ लाख, कळंब २९ कोटी ५१ लाख, परंडा ११ कोटी ९४ लाख तर उस्मानाबाद आगाराने २९ कोटी ६२ लाखांचा गल्ल जमवला आहे.
कोणाचा किती प्रवास?
उस्मानाबाद आगाराच्या ८२ बसेसने १ कोटी ३५ लाख, तुळजापूरच्या ८० बसगाड्यांनी १ कोटी ३२ लाख, उमरग्याच्या ६५ बसेसने १ कोटी २ लाख, भूम ५९ बसगाड्यांनी ८३ लाख, कळंबच्या ७१ बसेसने १ कोटी १ लाख, तर परंडा आगाराच्या ३५ गाड्यांचा मिळून ४१ लाख किलोमीटर प्रवास झाला.