उस्मानाबाद, तुळजापूर ३१ मे पर्यंत बंद; अफवा पसरविल्यास होणार गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 12:52 PM2020-05-20T12:52:14+5:302020-05-20T12:52:52+5:30
उस्मानाबाद येथे एका बाधिताचा मृत्यू झाल्याची बुधवारी सकाळी अफवा उठली. त्यामुळे बाजारपेठ बंद होण्यास सुरुवात झाली.
उस्मानाबाद : जिल्ह्यात 6 कोरोना बाधिताची नव्याने भर पडली आहे. यात उस्मानाबाद व तुळजापूर शहरातीलही प्रत्येकी एक रुग्ण आहे. दरम्यान, उस्मानाबाद येथे एका बाधिताचा मृत्यू झाल्याची बुधवारी सकाळी अफवा उठली. त्यामुळे बाजारपेठ बंद होण्यास सुरुवात झाली. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांनीही दोन्ही शहरे 31 मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद शहर, तुळजापूर शहर, जेवळी, गिरवली येथे प्रत्येकी एक तर खंडेश्वरी वाडी येथील दोघे बाधित आढळले आहेत. तुळजापुरातील महिला पुण्याहून तर इतर व्यक्ती मुंबईहून दाखल झाले आहेत. त्यांचे अहवाल मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास प्राप्त झाले. यानंतर प्रशासनाने संबधित शहर व गावात उपाययोजना सुरू केल्या. एकीकडे या उपाययोजना सुरू असतानाच बुधवारी सकाळी जिल्ह्यात एका अफवेने चांगलाच जोर धरला. उस्मानाबाद शहरात एका बधिताचा मृत्यू झाल्याची ही अफवा होती. ती चांगलीच पसरल्याने अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. यापाठोपाठ पोलिसांनीही अत्यावश्यक वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आवाहन शहरातून केले. दरम्यान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी तुळजापूर व उस्मानाबाद शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने 31 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान, मृत्यूची चर्चा ही मात्र अफवाच ठरली.
अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल
मृत्यू वगैरे घडल्याच्या कसल्याही घटनेवर चुकीची चर्चा घडवून अफवा पसरवू नयेत. कोरोना संदर्भातील खरी माहिती ही जिल्हा शल्य चिकित्सक किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनच दिली जाईल. याशिवाय कोणाकडूनही आलेल्या अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये. अशा पोस्ट फॉरवर्ड करू नयेत. लोकांमध्ये भीती पसरवण्याचा प्रकार घडल्यास संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात येतील.
-दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद