राज्य व्हॉलिबॉल संघाच्या कर्णधारपदी उस्मानाबादच्या निर्भय देशमुखची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 04:35 PM2020-01-07T16:35:08+5:302020-01-07T16:38:34+5:30
आंध्रप्रदेशातील बुचिरेडीपलंम (जि. नेल्लोर) येथे होणाऱ्या १४ वर्षाखालील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत निर्भय राज्य संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
उस्मानाबाद : येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील निर्भय संजय देशमुख याची महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशातील बुचिरेडीपलंम (जि. नेल्लोर) येथे होणाऱ्या १४ वर्षाखालील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत निर्भय राज्य संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
सासवड येथे पार पडलेल्या १४ वषार्खालील राज्यस्तरीय मुलांच्या व्हॅलीबॉल स्पर्धेत उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलचा संघ प्रथम आला होता. या संघातील निर्भय संजय देशमुख, ऋषिकेश डोंगरे यांची राज्य मुलांच्या संघात निवड झाली होती. तसेच मुलींच्या संघात याच विद्यालयातील श्रध्दा मसने हिची निवड झाली होती. निवडण्यात आलेल्या संघाचे लातूर येथे सराव शिबीर झाले. या सराव शिबिरानंतर महाराष्ट्राच्या मुलांच्या संघ कर्णधारपदी निर्भय संजय देशमुख याची निवड करण्यात आली आहे. निर्भयसह इतर खेळाडूंना संजय देशमुख, शैलेश पाचभाई यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष अंकुशराव पाटील, सचिव अप्पा पाळणे, संस्थाध्यक्ष शशिकलाताई घोगरे, कार्याध्यक्ष एम.डी.देशमुख, उपाध्यक्ष अॅड. अविनाशराव देशमुख, सचिव भाई धनंजय पाटील व सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक आर.एस.देशमुख, उपमुख्याध्यापक पी.एन.पाटील, पर्यवेक्षक एस.डी. गायकवाड व एन.एम. देटे आदीं कौतुक केले आहे.