उस्मानाबाद जिल्ह्यात भूजल पातळी ५ मिटरने खालावली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 07:00 PM2019-02-06T19:00:54+5:302019-02-06T19:03:22+5:30
उस्मानाबाद : अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाला. त्याचाच परिणाम म्हणून भूजलस्तरही त्याच गतीने खालावत आहे. जानेवारीअखेर भूजलपातळी ...
उस्मानाबाद : अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाला. त्याचाच परिणाम म्हणून भूजलस्तरही त्याच गतीने खालावत आहे. जानेवारीअखेर भूजलपातळी पाच मिटरने खोल गेली आहे. जिल्हाभरातील ११४ विहिरींच्या निरीक्षणातून ही बाब समोर आली आहे.
पावसाळ्यातील चार महिन्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ४० ते ४५ टक्के एवढे अत्यल्प पर्जन्यमान झाले. जिल्हाभरातील बहुतांश मोठे, मध्यम आणि लघु पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. तसेच भूजलस्तरही अपेक्षित प्रमाणात उंचावला नाही. दरम्यान, दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यानुसार आता भूजलस्तरही खालाऊ लागला आहे. भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेकडून मागील तीन महिन्यांत जिल्हाभरातील ११४ निरीक्षण विहिरींचे पातळीची पाहणी करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार भूजलस्तर सुमारे ५ मिटरने खालावला आहे. जानेवारी महिन्यात भूम तालुक्यातील २४ निरीक्षण विहिरींची पाणीपातळी तपासण्यात आली असता, मागील पाच वर्षांच्या तुलनेत ५़५३ मिटरने पातळी खालावली. तसेच कळंब तालुक्याची ५़५२ मीटरने खोल गेली. लोहारा ६़८८ मीटर, उमरगा ३़०५ मीटर, उस्मानाबाद ५़५३ मीटर, परंडा ४़२४ मीटर तर वाशी तालुक्याची ८़७६ मीटरने पाणीपातळी घटली आहे. जिल्ह्याचा विचार करता सरासरी पाच मिटरने जलस्तर खालावला आहे. त्यामुळे भविष्यात टंचाईचे सावट आणखी गडद होणार आहे.
जलस्त्रोत तोडताहेत दम
भूजल पातळी झपाट्याने खोल जावू लागली आहे. परिणामी जलस्त्रोतही झपाट्याने दम तोडू लागले आहेत. परिणामी टँकरसह अधिग्रहणांची मागणी वाढू लागली आहे. काही गावांत तर टँकर भरण्यासाठीही स्त्रोतांना पाणी नाही. अन्य गावांच्या शिवारातून पाणी आणण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.