सव्वापाच हजारांपैकी केवळ ७४९ गुरूजीनींच दर्शविली ‘टॅलेन्ट’ दाखविण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 05:11 PM2019-12-17T17:11:18+5:302019-12-17T17:14:53+5:30
पाचवी आणि आठवीच्या वर्गातील साडेपंधरा हजारावर विद्यार्थी देणार परीक्षा
- बाबूराव चव्हाण
उस्मानाबाद : विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी, शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी व सक्षमीकरणासाठी प्रज्ञा शोध परीक्षा (टॅलेन्ट सर्च) घेण्याबाबत निर्देशित केले आहे. विद्यार्थ्यांना आॅफलाईन तर शिक्षकांना आॅनलाईन नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार पाचवी व आठवीच्या वर्गातील १५ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या माध्यमातून ‘टॅलेंट’ दाखविण्याची तयारी दर्शविली आहे. तर दुसरीकडे विद्यार्थी घडविणाऱ्या सव्वापाच हजारांपैकी केवळ ७४९ गुरूजीच परीक्षा देण्यास तयार आहेत, हे विशेष.
विद्यार्थ्यांसोबत गुरूजींचीही प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यामागे वेगवेगळे उद्देश आहेत. परीक्षेच्या निमित्ताने विद्यार्थी व गुरूजींचे चौफेर वाचन होवून त्यांच्या ज्ञानकक्षा रूंदाव्यात, परीक्षीच्या तयारीमुळे जिल्हाभरातील शिक्षक शिक्षणातील नवप्रवाह, शिक्षणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी , मुल्यमापनाच्या वेगवेगळ्या पद्धती, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांची कार्ये, वयोगटनिहाय अध्ययनस्तर, शिक्षक क्षमता बांधणी यासह आदी उद्देश समोर ठेवून जिल्हास्तरावर पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठीही प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात यावी, असे निर्देश औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आॅनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षकांना केले होते. तर विद्यार्थ्यांचे अर्ज आॅफलाईन स्वीकारण्यात आले. निर्धारित मुदतीत उस्मानाबाद तालुक्यातील ३ हजार ३७८, तुळजापूर ३ हजार ३८७, उमरगा २ हजार ३९५, लोहारा ८५७, वाशी २ हजार २३८, भूम १ हजार २९४ आणि परंडा तालुक्यातील १ हजार २२९ विद्यार्थ्यांनी नाव नोेंदणी करून परीक्षा देण्याची तयारी दर्शविली. यामध्ये पाचवीच्या वर्गातील मराठी माध्यमाचे ११ हजार १८८ आणि उर्दू माध्यमाचे २३३ विद्यार्थी आहेत. यांच्या परीक्षेचे नियोजन ६२ केंद्रांवर करण्यात आले आहे. तर आठवीच्या वर्गातील ४ हजार १२६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. २९ केंद्रावर परीक्षेचे नियोजन केले आहे.
अधिकाधिक शिक्षक परीक्षा देतील, असे अपेक्षित होते
एकीकडे साडेपंधरा हजारावर विद्यार्थ्यांनी प्रज्ञा शोध परीक्षेच्या माध्यमातून आपल्यातील ‘टॅलेन्ट’ दाखविण्याची तयारी दाखविली आहे. असे असतानाच दुसरीकडे शिक्षक मात्र, आपल्यातील टॅलेन्ट दाखविण्यात फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेचे प्राथमिक आणि माध्यमिक माध्यमाचे मिळून थोडेथोडके नव्हे तर तब्बल सव्वापाच हजारापेक्षा अधिक शिक्षक आहेत. ही परीक्षा संबंधित शिक्षकांसाठी ऐच्छिक आहे. असे असले तरी अधिकाधिक शिक्षक परीक्षा देतील, असे अपेक्षित होते. परंतु, मुदतीअंती चिंताजनक चित्र समोर आले आहे. जिल्हाभरातील अवघ्या ७४९ शिक्षकांनीच परीक्षेच्या माध्यमातून आपल्यातील टॅलेन्ट दाखविण्याची तयारी दर्शविली आहे. यामध्ये २६ मुख्याध्यापक, २२ माध्यमिक शिक्षक, २०५ पदवीधर शिक्षक व प्राथमिक शिक्षकांची संख्या ४९६ एवढी आहे. यामध्ये १३१ महिला शिक्षक तर ६१८ पुरूष शिक्षक आहेत. उपरोक्त अत्यल्प संख्या लक्षात घेता, शिक्षकांना स्वत:तील टॅलेन्ट दाखविण्यास भिती वाटते की का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.