ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:06+5:302021-06-30T04:21:06+5:30
(फोटो : २९ समीर) उमरगा : येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून, सोमवारी वैद्यकीय अधीक्षक ...
(फोटो : २९ समीर)
उमरगा : येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून, सोमवारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे यांच्या हस्ते मशिनरीचे पूजन करण्यात आले. तांत्रिक विभागाने प्रकल्पाची चाचणी घेतली असून, ती यशस्वी झाली आहे. त्यामुळे उर्वरित काम गतीने मार्गी लागल्यास रुग्णालयातील सर्व कक्षाला लवकरच हवेतून मिळणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होणार आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मोठी कमतरता जाणवली. ही गरज ओळखून उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँक उभारणी परवानगी आ. ज्ञानराज चौगुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती शिवाय अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडेही त्यांनी यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर ऑक्सिजन टँकच्या प्लांटला मंजुरी मिळाली. मात्र, पुढच्या कामाच्या हालचाली होत नव्हत्या. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हा प्रकल्प लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना उमरगा येथील दौऱ्यात दिल्या होत्या.
दरम्यान, सोमवारी पीएसए ऑक्सिजन प्लांटची पूर्व तपासणी व उद्घाटन डॉ. बडे यांच्या करण्यात आले. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक रूपेश देशमुख, सेवा अभियंता विनय पाटे (पुणे), डॉ. विक्रम आळंगेकर, औषध निर्माण अधिकारी आनंद सुटनुरे, कार्यालयीन अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, साहाय्यक अधीक्षक हणमंत कुंभार, अमर पवार, शीतल चिलोबा, विद्यासागर फुलसुंदर, स्वाती डोंगरे, सुभद्रा गाढवे, प्रकल्प बांधकामाचे ठेकेदार विजय काळे उपस्थित होते. कोरोनाच्या लाटेत उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा कमी होत होता. आता प्रकल्पच सुरू होणार असल्याने येणाऱ्या काळात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. प्रकल्पाची पूर्व चाचणी यशस्वी झाली असून, उर्वरित कामाला प्रशासकीय स्तरावरून गती मिळणे आवश्यक आहे.