पळसपमधील रोपे कर्नाटकातही खाताहेत भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:22 AM2021-01-01T04:22:01+5:302021-01-01T04:22:01+5:30
तेर : यंदा पाऊस चांगला झाल्याने जमिनीत पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतातील विंधन विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध ...
तेर : यंदा पाऊस चांगला झाल्याने जमिनीत पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतातील विंधन विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असून, बहुतांश शेतकरी फळ, भाजीपाला लागवडीकडे वळले आहेत. त्यामुळेच ‘रोप निर्मिती करणारे गाव’ म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील रोपांना सध्या महाराष्ट्रासोबतच कर्नाटकातून देखील चांगलीच मागणी वाढली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील बहुतांश शेतकरी विविध फळ व भाजीपाला रोपांची निर्मिती करतात. त्यामुळे या गावाची ओळखच ‘रोप निर्मिती करणारे गाव’ अशी झाली आहे. राज्यासह परराज्यातून देखील येथील येथील रोपांना मोठी मागणी असते. २०२० मध्ये चांगला पाऊस झाल्याने शेती शिवारातील नदी, नाले, ओढे, विंधन विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतकरी या पाण्याच्या माध्यमातून आपल्या शेतात फळ, भाजीपालाचे लागवड करताना दिसत आहेत. सध्या सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातील शेतकरी देखील पळसप येथून भाजी पाल्याची रोपे खरेदी करून घेऊन जात आहेत.
आंतरपीक म्हणून फळभाज्यांना पसंती
मुबलक पाणीसाठा झाल्याने अनेक शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत. परंतु, याच उसामध्ये आंतरपीक म्हणून फळभाज्यांची लागवड केली जात आहे. यामध्ये विशेषत: बटाटे, फुल कोंबी, मिरची, टोमॅटो आदी आंतरपिके घेण्यात येत असल्याचे रोपांच्या मागणीवरून दिसून येते.
कोट...
या वर्षी पाऊसकाळ चांगला झाल्याने भाजीपाला रोपाला मागणी जास्त आहे. त्यामुळे नक्कीच इतर वर्षीच्या तुलनेत यंदा चार पैसे नफा जास्त मिळत आहे.
- महादेव नरवडे, रोप विक्रेते, पळसप
रोप विक्रीच्या माध्यमातून पळसपमध्ये लाखों रुपयांची उलाढाल होते आहे. मागील काही वर्षांत येथे रोपनिर्मितीच्या माध्यमातून अनेकांचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे. रोपांना शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे चांगला फायदा होत आहे.
- ज्ञानराज सरडे, कांदा रोप विक्रेते, पळसप
असे आहेत रोपांचे दर
पळसप येथे यंदा मिरची रोपाचा दर ७० पैसे ते १.१० फ, वांगे ७० ते ८० पैसे, पत्ता कोबी ६० पैसे, फ्लाॅवर ७० पैसे, टोमॅटो ७० पैसे ते १ रुपया, टरबूज दीड ते तीन रुपये, खरबूज दोन ते अडीच रुपये याप्रमाणे दर लावले जात आहेत. यात विशेषत: कांदा रोपांना सध्या मोठी मागणी असल्याचे रोप उत्पादक सांगत आहेत.