शिवरस्त्याच्या वादातून चुलत भावानेच केली पंचायत समिती सदस्याची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 07:36 PM2020-05-27T19:36:48+5:302020-05-27T19:37:58+5:30
देवळाली ते वंंजारवाडी या १८ लाख ४२ हजार ५०० रुपये अंदाजपत्रकाच्या शिवरस्त्याच्या कामावरुन गेल्या महिनाभरापासून तक्रारी सुरु होत्या.
परंडा (जि़उस्मानाबाद) : देवळाली, वंजारवाडी शिवरस्त्याच्या कारणावरुन झालेल्या वादात भूम तालुक्यातील देवळाली येथील शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य बाजीराव कल्याण तांबे-पाटील यांची मंगळवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली आहे़ याप्रकरणी मयताच्या चुलत भावासह १२ जणांविरुद्ध परंडा पोलिसात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला़
देवळाली ते वंंजारवाडी या १८ लाख ४२ हजार ५०० रुपये अंदाजपत्रकाच्या शिवरस्त्याच्या कामावरुन गेल्या महिनाभरापासून तक्रारी सुरु होत्या. ८ मे रोजी किरण भाऊसाहेब तांबे-पाटील, प्रकाश भागवत गोरे व इतरांनी या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती़ याच कारणावरुन आरोपींचे पंचायत समिती सदस्य बाजीराव कल्याणराव तांबे यांच्याशी ९ मे रोजी भांडण झाले होते. त्याचीही पोलिसात नोंद झालेली आहे.
तसेच प्रकाश भागवत गोरे यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली होती. या जुगार अड्ड्याची माहिती बाजीराव तांबे यांनीच पोलिसांना दिली, असा आरोपींना संशय होता. याचाच राग मनात धरुन आरोपी चंद्रकांत रावसाहेब तांबे, सूर्यकांत रावसाहेब तांबे, मधुकर रावसाहेब तांबे, रामनाथ चंद्रकांत तांबे, किरण भाऊसाहेब तांबे, प्रवीण लिंगाप्पा शेटे, अभिजीत लिंगाप्पा शेटे, श्रीपती भारत विधाते, प्रकाश भागवत गोरे, दिनकर उर्फ दिनेश गोरे, फकिरा गोरे, चंद्रकांत दिनानाथ शेटे (सर्व रा. देवळाली) यांनी संगनमत करुन बाजीराव तांबे यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर मंगळवारी रात्री अडविले़ येथे पुन्हा वाद घालून आरोपींनी धारधार शस्त्र पोटात भोसकून बाजीराव तांबे यांची हत्या केली. घटना समजताच भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल खांबे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अंकुश कल्याणराव तांबे-पाटील यांच्या तक्रारीवरुन परंडा पोलिसात घटनेची नोंद झाली असून, पोलीस निरीक्षक एकबाल सय्यद अधिक तपास करीत आहेत.