पांगरी, ब्रह्मगावचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:39 AM2021-09-08T04:39:41+5:302021-09-08T04:39:41+5:30
पारगाव : वाशी तालुक्यातील हातोला येथील हातोली नदीला मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास पूर आला. यामुळे पारगावपासून पूर्वेला दहा ...
पारगाव : वाशी तालुक्यातील हातोला येथील हातोली नदीला मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास पूर आला. यामुळे पारगावपासून पूर्वेला दहा किमी. अंतरावर असलेल्या पांगरी व ब्रह्मगाव या गावांत जाण्यासाठी असलेला पूल पाण्याखाली गेल्याने या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.
पारगाव येथून पूर्वेला १० किमी. अंतरावर पांगरी, जेबा, ब्रम्हगाव ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. ही तिन्ही गावे हातोला येथून अनुक्रमे ५ किमी. अंतरावर वेगवेगळ्या दिशेला आहेत. यातील पांगरी व ब्रह्मगाव या गावाला जाण्यासाठी हातोला येथील हातोली नदीवरील पुलावरून जावे लागते. हातोला नदीचा उगम येथीलच साठवण तलावाच्या सांडव्यातून होतो. दिवसभर झालेल्या व तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे हातोला येथील साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून पाणी सांडव्यातून वाहिले. यामुळे सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान हातोला नदीला पूर आला. या पुरामुळे हातोली नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने हा रस्ता बंद झाला. परिणामी पांगरी व ब्रह्मगाव या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे पांगरी व ब्रह्मगावच्या बाहेरगावी गेलेल्या नागरिकांना आपापल्या सोयीनुसार हातोला, पारगाव येथेच मुक्कामी राहावे लागले.
चौकट........
पारगाव येथून गिरवली गावाला जाणाऱ्या मधल्या रस्त्यावर गिरवलीजवळ असलेल्या ओढ्यावरील पूल याआधीच खचलेला होता. याबाबत ‘लोकमत’ने अनेक वेळा बातम्या प्रकाशित करून प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्षही वेधले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हा रस्ता पूर्णपणे खचला असून, या ओढ्यावरील पूर्ण डांबरी रस्ता व पूल वाहून गेला असल्याने या ठिकाणावरून गिरवलीकडे जाण्यासाठी रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.