VIDEO: हसता हसता मृत्यूनं गाठलं; निरोपाचे भाषण देत असतानाच सर्वांसमोर वर्षाने सोडले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 15:59 IST2025-04-05T15:55:18+5:302025-04-05T15:59:37+5:30
धाराशिवमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा भाषण देत असताना दुर्दैवी मृत्यू झाला.

VIDEO: हसता हसता मृत्यूनं गाठलं; निरोपाचे भाषण देत असतानाच सर्वांसमोर वर्षाने सोडले प्राण
गेल्या काही महिन्यांपासून आकस्मित मृत्यंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. व्यायाम करताना, शाळेत, चालताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन अनेकांचा जीव गेल्याच्या घटना समोर आहेत. अशातच धाराशिवच्या परांडा तालुक्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. परांडा येथील एका कॉलेजमध्ये निरोप समारंभाचे भाषण देत असतानाच एका विद्यार्थिनीला मृत्यूने गाठलं. भाषण संपवत असताना विद्यार्थिनी खाली कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला. विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांसह कॉलेजवर शोककळा पसरली आहे.
निरोप समारंभात भाषण करताना चक्कर येऊन पडल्यानंतर विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना परंडा शहरातील रा. गे. शिंदे महाविद्यालयात घडली. २० वर्षीय वर्षा खरात असं या विद्यार्थिनीचे नाव आहे. बीएससीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ सुरु असताना वर्षा भाषण करत होती. मात्र ती अचानक खाली कोसळल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. सर्वांनी वर्षाकडे धाव घेतली आणि तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून वर्षाला मृत घोषित केले. वर्षाच्या मृत्यूची बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली. काही मिनिटांपूर्वी भाषण देत असलेली वर्षा आपल्यातून निघून गेल्याचे अनेकांना खरं वाटत नव्हतं.
या घटनेमुळे महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वर्षा भाषण करत असतानाच हा प्रकार घडला. त्यावेळी तिचे भाषण कोणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते. तो व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात वर्षा खाली कोसळताना दिसत आहे. दरम्यान, वर्षाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाढलेल्या उन्हामुळे तिला भोवळ आल्याने हे घडल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. तर काहींच्या मते वर्षाला हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र डॉक्टरांकडून वर्षाच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
निरोप समारंभाचे भाषण देत असताना विद्यार्थिनीचा मृत्यू; परांडा येथील घटना#Paranda#Dharashivpic.twitter.com/nJe8ic12XM
— Lokmat (@lokmat) April 5, 2025
भाषणात काय म्हणत होती वर्षा?
वर्षाने भाषणात बोलताना, प्रत्येक जण आपापल्या परीने जेवढा जमेल तेवढा अभ्यास करत असतो... असं म्हणताच सर्व विद्यार्थी हसू लागले. त्यानंतर वर्षा तिच्या शिक्षकांविषयी सांगू लागली. मात्र तितक्यातच खाली कोसळली.