परांड्याचा पेच सुटला, जागा पवारांकडे; ठाकरेसेनेच्या पाटील यांची ३ मिनिटे बाकी असताना माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 03:51 PM2024-11-04T15:51:59+5:302024-11-04T15:57:09+5:30
चर्चेअंती जागा शरद पवार गटाला आपल्या पारड्यात पाडण्यास यश आले.
धाराशिव: मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात यावेळी उद्धवसेना व शरद पवार गटाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता. मात्र, ही जागा शरद पवार गटाला आपल्या पारड्यात पाडण्यास यश आले. ठाकरेसेनेच्या रणजीत पाटील यांनी अखेरच्या क्षणी ३ मिनिटे बाकी असताना २ वाजून ५७ मिनिटांना उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे येथे शिंदे सेनेचे तानाजी सावंत यांना पवार गटाच्या राहुल मोटे यांचे थेट आव्हान असेल.
राष्ट्रवादी (श.प.)चा परांडा मतदारसंघावर दावा होता. तरीही उध्दवसेनेने पहिल्या यादीत दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यातच उध्दवसेनेने आधीच उमेदवार जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी आमदार राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, राहुल मोटे यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठाकरेसेनेच्या रणजीत पाटील यांनी देखील एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला होता. येथे मैत्रीपूर्ण लढत होईल अशी राजकीय गोटात चर्चा सुरू होती. दरम्यान, ठाकरेसेना आणि राष्ट्रवादी पवार गटाने परांड्याच्या जागेवरून निर्माण झालेला पेच आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोडवला. यात पवार गटाला जागा सोडवून घेण्यात यश आले. त्यानंतर आज अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तीन मिनिटे बाकी असताना रणजीत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
कोण आहेत राहुल मोटे?
राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून २००४, २००९ आणि २०१४ या तीन निवडणुकांत विजय मिळविला आहे. मोटे यांनी रणजित पाटील यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांचा दोन वेळा पराभव केला आहे.
लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?
मागच्या लोकसभा निवडणुकीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या परंडा विधानसभा मतदारसंघातून उद्धवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांना ८१ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तेव्हाचे मुद्दे आता पूर्णत: राहिले नसले तरी ती वावटळ अजूनही पूर्णपणे शमलेली नाही. लोकसभेला सोयाबीन दराचा मुद्दा मतदारांनी उचलून धरला होता. आताही तो आहेच. त्यातून महायुती कसा मार्ग काढते? यावर बरेच काही अवलंबून आहे.