पालकांना पोटगी देईना, मुलाविरुद्ध उस्मानाबाद येथे गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:38 PM2018-01-11T18:38:40+5:302018-01-11T18:47:30+5:30
वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणार्या मुलास येथील उपविभागीय दंडाधिकार्यांनी १० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश सहा महिन्यांपूर्वी दिला होता़ मात्र, त्यानंतरही पोटगी न देणार्या मुलाविरुद्ध गुरुवारी उस्मानाबादच्या आनंदनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
उस्मानाबाद : वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणार्या मुलास येथील उपविभागीय दंडाधिकार्यांनी १० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश सहा महिन्यांपूर्वी दिला होता़ मात्र, त्यानंतरही पोटगी न देणार्या मुलाविरुद्ध गुरुवारी उस्मानाबादच्या आनंदनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
उस्मानाबाद तालुक्यातील दारफळ येथील ८० वर्षीय लक्ष्मण जनार्दन देशपांडे व त्यांची त्यांची पत्नी प्रभावती यांना श्यामसुंदर हा एकुलता एक मुलगा आहे़ त्याने आपल्या आईच्या नावावरील मेडसिंगा येथील जमिनीमध्ये वीजजोडणी घेण्याचे कारण दाखवत शंभर रुपयाचा स्टॅम्प आईच्या नावे खरेदी करुन त्यावर आईची सही घेत जमिनीचे वाटणीपत्र लिहून घेतले. त्यानंतर त्यावर स्वत:चे नाव लावून घेत या संपत्तीतून आईला बेदखल केले. त्याचप्रमाणे वडिलांच्या नावे सांजा रोड भागातील प्लॉट व दारफळ येथील राहते घरही स्वत:च्या नावे करुन घेत आई-वडिलांना बेदखल केले़ त्यांचा सांभाळ करण्यास श्यामसुंदर नकार देत असल्याने वृद्ध माता-पित्यांनी मुलाविरुध्द उस्मानाबादचे उपविभागीय दंडाधिकारी चेतन गिरासे यांच्याकडे माता-पिता संगोपन कायद्यातंर्गत दाद मागितली.
सुनावणी अंती श्यामसुंदर देशपांडे आई-वडिलांचा सांभाळ करीत नसल्याचे स्पष्ट झाले़ त्यामुळे वृद्ध माता-पित्याच्या चरितार्थ व निर्वाह खर्चासाठी दरमहा १० हजार रुपये देण्याचा आदेश १० जुलै २०१७ रोजी दिला़ या आदेशविरुध्द श्यामसुंदर याने जिल्हाधिकार्यांकडे अपील केले. हे अपील तेथे फेटाळून लावण्यात आले़ यानंतरही श्यामसुंदरने माता-पित्यास एक रुपयाही दिला नाही़ याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी आनंदनगर ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कलम १८८ व जेष्ठ नागरिकांचे चरितार्थ व लोककल्याणासाठीचे अधिनियम २००७ मधील कलम २४ व २५ नुसार श्यामसुंदर देशपांडेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक मुरळीकर करीत आहेत.