वीज पडून पशुधन दगावलेल्या पालकांना मदतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:09 AM2021-09-02T05:09:58+5:302021-09-02T05:09:58+5:30
अजित चंदनशिवे तुळजापूर : तालुक्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांत वीज पडून १९ पशुपालकांची ५१ जनावरे दगावली होती. ...
अजित चंदनशिवे
तुळजापूर : तालुक्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांत वीज पडून १९ पशुपालकांची ५१ जनावरे दगावली होती. प्रशासनाने याचे पंचनामे केल्यानंतर यातील ६ शेतकरी, पशुपालकांच्या ७ जनावरांचे प्रस्ताव शासन निकषानुसार अपात्र ठरले. त्यामुळे उर्वरित ४४ जनावरांच्या पालकांना मदत मिळावी यासाठी तहसील स्तरावरून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, अद्याप एकाही पशुपालकाला ही मदत मिळालेली नाही. त्यामुळे हे पशुपालक सध्या आर्थिक अडचणीचा सामना करीत आहेत.
कधी कमी तर कधी जास्त पाऊस, वादळी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना नेहमीच फटका बसतो. त्यातच एखादे पशुधन दगावले तरी शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. त्यामुळेच शासनाकडून नैसर्गिक आपत्ती म्हणून वीज पडून दगावलेल्या जनावरांपोटी पशुपालक व शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. तुळजापूर तालुक्यात एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत वडाचा तांडा, गुळहळ्ळी, निलेगाव, होर्टी, गुजनूर, चिकुंद्रा, पांगरधरवाडी, केमवाडी, बारूळ, कामठा, सावरगाव, दीपकनगर तांडा, काटगाव, वडगाव देव, चिवरी, फुलवाडी, आरळी (खु.) आदी गावांतील १९ शेतकरी, पशुपालकांची ५१ जनावरे दगावली. त्यामध्ये शासन निकषानुसार गुजनूर, चिकुंद्रा, केमवाडी, सावरगाव, चिवरी, फुलवाडी येथील ७ जनावरांचे प्रस्ताव अपात्र ठरले. तर उर्वरित १२ मोठी दुधाळ जनावरे, ओढकाम करणारे ४ मोठी, २ लहान जनावरे तसेच २६ शेळ्यांचे प्रस्ताव पात्र ठरले. यानुसार तहसील प्रशासनाकडे याच्या मदतीसाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव दाखल केले; परंतु शासनाकडून अद्यापही ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, निधीची मागणी केली आहे. सर्व प्रस्ताव शासन स्तरावर रीतसर पाठविले आहेत.
चौकट........
पाच लाखांची मदत, तीही वेळेत मिळेना
तालुक्यात वीज पडून दगावलेली ४४ जनावरे आहेत. यासाठी शेतकरी, पशुपालक यांना मदतीसाठी ५ लाख ६१ हजार रुपयांचा निधी आवश्यक आहे; परंतु तोही शासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे नैसर्गिक आपत्ती येऊनही पशुपालकांना वेळेत मदत मिळत नसल्याचे दिसत आहे.
कोट.......
मी शेती करून कुटुंबाची उपजीविका भागवितो. निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शेतीला पूरक म्हणून मी दुग्ध व्यवासयही करतो; परंतु एप्रिल महिन्यात दूध व्यवसायासाठी असलेल्या म्हशी व गाय वीज पडून दगावले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याला चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी शासनाकडून मदत मिळालेली नाही.
- तानाजी शिंदे, पांगरधरवाडी