चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाचा मृत्यू, तुळजापुरातील कुतवळ हाॅस्पिटलचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 05:00 PM2021-10-30T17:00:50+5:302021-10-30T17:02:29+5:30
चाैकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांकडून कारवाई
उस्मानाबाद : तीन सदस्यीय चाैकशी समितीच्या अहवालाअंती तुळजापूर शहरातील कुतवळ मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलचा बाॅम्बे नर्सिंग हाेम रजिस्ट्रेशन परवाना रद्द करण्यात आला. याबाबतचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. धनंजय पाटील यांनी काढले आहेत. एका रुग्णाला चुकीची वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.
तुळजापूर येथील कुतवळ रुग्णालयात अठरावर्षीय प्रतीक्षा प्रकाश पुणेकर या रुग्णावर उपचार सुरू हाेते. उपचार सुरू असतानाच संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला हाेता. चुकीची वैद्यकीय सेवा दिल्याने प्रतीक्षाचा मृत्यू झाला, असा आराेप नातेवाइकांनी केला हाेता. या प्रकरणाची सखाेल चाैकशी करून डाॅ. दिग्विजय कुतवळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी नातेवाइकांनी केली हाेती.
डाॅ. दिग्विजय कुतवळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, यासाठी अनेकवेळा आंदाेलनही केले. याची दखल घेत तक्रारीच्या अनुषंगाने चाैकशीसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत बाबरे, डॉ. आर. यू. सूर्यवंशी, डॉ. ए.एस. धुमाळ या तीन डाॅक्टरांची चाैकशी समिती नेमण्यात आली हाेती.
चाैकशीअंती डॉ. दिग्विजय कुतवळ हे शासकीय वैद्यकीय अधिकारी असताना व्यवसायरोध भत्ता (एनपीए) घेऊनही ते नियमबाह्य खासगी दवाखाना चालवत. प्रतीक्षा पुणेकर हिच्या उपचारादरम्यान तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक होत. मात्र, डाॅ. कुवतळ यांनी तसे केले नाही. नातेवाइकांनी रुग्णास रेफर करण्याची वेळाेवेळी विनंती केली. परंतु, रुग्णास रेफर केले नाही. एवढेच नाही तर संबंधित रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणपत्रही दिले नाही. मृत्यूच्या कारणासाठी शवविच्छेदनही केले नाही. संबंधित रुग्णाचा मृत्यू हा ‘प्लमोनरी’मुळे झाला असावा, असे असे निरीक्षण नाेंदविले आहे. या अहवालाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. पाटील यांनी कुतवळ मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलचा बाॅम्बे नर्सिंग हाेम रजिस्ट्रेशन परवाना रद्द केला आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
‘एनपीए’ उचलत असल्याने परवाना रद्द
दीड वर्षापूर्वी एका मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या प्रकरणात नातेवाइकांची तक्रार आली असता तीन सदस्यांच्या पथकाने चाैकशी केली. चाैकशीअंती ते डॉक्टर म्हणून उपजिल्हा रुग्णालयात नोकरीस असताना खासगी रुग्णालयात सेवा देत होते. शिवाय, ‘एनपीए’ उचलत असल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
-डॉ. धनंजय पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, उस्मानाबाद