"पवारसाहेब, सुप्रिया सुळेंना हा नंगानाच चालणार नाही, हा माझा राष्ट्रवादीतला अनुभव"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 05:18 PM2023-01-09T17:18:09+5:302023-01-09T17:20:40+5:30
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ हा वाद थांबता थांबेना झालाय. "मेरी DP इतनी ढासू, चित्रा मेरी सासू" असं उर्फीने पुन्हा ट्विट करुन म्हटलं आहे
उस्मानाबाद - अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) केवळ एकाच कारणाने चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तिच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदला बेड्या घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर, हा वाद महिला आयोगापर्यंत पोहोचला आणि राष्ट्रवादी विरुद्ध भाजप समर्थकांमध्ये चढाओढ लागल्याचं दिसून आलं. यावरुन, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली, त्यावर आता चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या समर्थकांना सवाल केला. तसेच, स्वत:चा अनुभवही सांगितला.
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ हा वाद थांबता थांबेना झालाय. "मेरी DP इतनी ढासू, चित्रा मेरी सासू" असं उर्फीने पुन्हा ट्विट करुन म्हटलं आहे. तर दुसरीकडे चित्रा वाघ यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी, वाघ यांनी पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला. तसेच, यांच्याकडे जे पद आहे, ते पद आम्ही यापूर्वीच भोगलं आहे, असे म्हणत चाकणकर यांच्यावर निशाणा साधला. तसेच, मी २० वर्षे राष्ट्रवादीत काम केलंय. मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगते की, पवारसाहेब किंवा सुप्रिया ताई यांनाही हा नंगानाच आवडणार नाही, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
सध्या या प्रकरणावरुन जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेद, ते जर कुणाला थांबवायचे असतील तर अगोदर आपल्या ताईंना सांगा. याच ताईंच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण आमदार होत्या, तेव्हा त्यांनी रस्त्यावरील कापड दुकानातील स्टँच्यूंना अंडरगारमेंट घालण्यासंदर्भात आवाज उठवला होता. तीही गोष्ट चांगली होती, असे म्हणत विद्या चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेची चित्रा वाघ यांनी आठवण करुन दिली. तसेच, महाराष्ट्रात काहीही झालं तरी हा नंगानाच थांबायलाच हवा, यामुळे समाजात एक पिढी वाया जात असून तरुण मुलींवर याचा विपरीत परिणाम होतो, असेही वाघ यांनी म्हटले.