पगार महिन्याच्या एक तारखेलाच करा; महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचाऱ्यांचे उपोषण
By सूरज पाचपिंडे | Published: April 26, 2023 06:07 PM2023-04-26T18:07:55+5:302023-04-26T18:09:02+5:30
आरोग्य कर्मचाऱ्यांची मासिक वेतन कपात स्लीप देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला.
धाराशिव : मासिक वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी बुधवारपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होणे अपेक्षित आहे. मात्र, त्यास विलंब होत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने उपोषणास बसावे लागल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
आरोग्य कर्मचाऱ्यांची मासिक वेतन कपात स्लीप देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला. आरोग्य कर्मचाऱ्यांची मूळ व दुय्यम सेवा पुस्तिका अद्यावत करण्यात यावी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे १०,२०,३० कालबद्ध पदोन्नती आदेश निर्गमित करण्यात यावेत, वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयकाचा निपटारा करण्यात यावा आदी मागण्या उपोषणकर्त्यांनी लावून धरल्या असून, मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. आंदोलनात जिल्हाध्यक्ष गुरुदत्त बेद्रे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, मंगल मुसळे, ज्ञानेश्वर लग्गड, महावीर कंदले सहभागी झाले आहेत.