शेंगातील बियांची झाडालाच उगवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:39 AM2021-09-09T04:39:31+5:302021-09-09T04:39:31+5:30
तामलवाडी : खरीप हंगामात पेरणी केलेले उडीद पीक काढणीला आले असतानाच पूर्वा नक्षत्राचा दमदार पाऊस झाला. यामुळे उडीदाच्या झाडाला ...
तामलवाडी : खरीप हंगामात पेरणी केलेले उडीद पीक काढणीला आले असतानाच पूर्वा नक्षत्राचा दमदार पाऊस झाला. यामुळे उडीदाच्या झाडाला शेंगातून उडीद बियाणाची उगवण होऊ लागली असून, त्यामुळे सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्रावरील उडीदाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आणखीन संकटात सापडला आहे.
काटी मंडळ कृषी कार्यालयांतर्गत गावात ३ हजार क्षेत्रावर उडीदाची पेरणी झाली. मध्यतरी पावसाने दीड महिना ओढ दिल्याने झाडाला चार-चारच शेंगा लागल्या होत्या. यातून कसाबसा पेरणीचा खर्च पदरात पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र दीड महिन्यानंतर पूर्वा नक्षत्राच्या पावसाला दमदार सुरवात झाली. चालू आठवड्यात सलग पाच दिवस पाऊस झाला. या शिवारातील दीड हजार हेक्टरवरील उडीदाची काढणी झाली होती. मात्र, शेतात काढणीवाचून शिल्लक राहिलेल्या दीड हजार हेक्टर क्षेत्रावरील उडीद पावसात भिजला. अति पावसाने उडीदाच्या झाडाला लागलेल्या शेंगातील बियांची झाडावरच उगवण होवू लागली आहे. हातातोंडाशी आलेल्या उडीदाची उगवण होऊ लागल्याने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतात पाणी व जमीन ओलसर असल्याने त्याची काढणी करता येत नाही. बुधवारी पाऊस थांबून उन्ह पडल्याने ओलावा धरलेल्या शेंगातून कोंब बाहेर पडताना दिसून आले. त्यामुळे दीड हजार हेक्टर क्षेत्रावरील उडीदाचे पीक पावसामुळे धोक्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
चौकट
मी एक एकर क्षेत्रात उडीदाची पेरणी केली आहे. यासाठी खते, बियाणे, खुरपणी आदींकरिता जवळपास १५ हजार रुपये खर्च केला. परंतु, सलग पाच दिवस पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या उडीदाच्या शेंगा आता झाडालाच उगवत आहेत. त्यामुळे हातात पडणाऱ्या उत्पन्नातून पेरणीचा खर्च तरी निघतो की नाही, याचीही शंका आहे.
- शंकर मगर, शेतकरी, सांगवी (काटी )
चौकट
उडीद पिकाला जास्तीचा पाऊस चालत नाही. काटी मंडळात ५० टक्के उडीदाची काढणी झाली असली तरी शिल्लक काढणीला आलेला उडीदाच्या शेंगातील बिया सततच्या पावसामुळे उगवत आहेत. अशा शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तातडीने विमा कंपनीकडे रीतसर तक्रार करून घ्यावी.
- आनंद पाटील, मंडळ कृषी अधिकारी, काटी