वीजबिल थकाबकी दुप्पटीवर गेल्याने २४ लाईनमनवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 07:48 PM2019-03-05T19:48:45+5:302019-03-05T19:51:42+5:30
गत महीन्यातही काही कर्मचाऱ्यांना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी असा दणका दिला होता.
कळंब (जि. उस्मानाबाद) : गत मार्चच्या तुलनेत यंदा थकबाकी दुप्पटीवर गेली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याचे खापर आता लाईनस्टाफच्या कर्मचाऱ्यांवर फोडण्यास सुरुवात केली आहे.यातूनच तालुक्यातील २४ लाईनस्टाफच्या फेब्रुवारी महिन्यातील वेतनातून २५ टक्के रक्कम दंड स्वरूपात कपात केली आहे. या प्रकारामुळे फिल्डवरील कर्मचाऱ्यांनी मात्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
कळंब शहरासह तालुक्यातील ९५ गावात विजपुरवठा करण्याचे काम महावितरण करत आहे. यासाठी कळंब येथे उपकार्यकारी अभियंता तर इटकूर, शिराढोण, दहिफळ, मोहा, येरमाळा, गोविंदपूर व कळंब येथे शाखा कार्यालय आहेत. या अंतर्गत कळंब येथे १३२ केव्ही विजकेंद्र तर इतर १७ ठिकाणी ३३ केव्ही उपकेंद्र कार्यरत आहेत. यातून वीज वितरण करणारे महावितरणचे उपकेंद्र, त्यावरील फिडर, विद्युत वाहिण्या व रोहित्र यांचे मोठे जाळे तालुक्यात पसरले आहे. याच्या देखभाल, किरकोळ दुरूस्तीची व वीज देयकांच्या वसूलीची जबाबदारी गावपातळीवरील लाईनस्टाफवर सोपवण्यात आली आहे. तालुक्यात यासाठी जवळपास १३९ विद्युत तंत्रज्ञ कार्यरत आहेत.
याशिवाय आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून ४५ अन्य तंत्रज्ञ काम पाहत आहेत. ग्रामीण भागातील विद्युत वितरणाची संपूर्ण जबाबदारी उपरोक्त कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, उपलब्ध कर्मचाऱ्यांवर देखभाल व दुरूस्तीच्या कामाचा मोठा भार असतानाच, वसूलीची जबाबदारी ही त्यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. अलिकडील काळात ग्रामीण भागातील घरगुती वापराच्या ग्राहकांच्या विद्युत देयकासंदर्भात असंख्य अडचणी आहेत. अव्वाच्या सव्वा आकारलेली देयके ग्राहक स्विकारत तर नाहीतच शिवाय त्यांच्या दुरूस्तीसाठी महिनो न महिन्याचा कालापव्यय होत आहे. असे असतानाही वीज वितरण कंपनीने विद्युत बिल वसुलीच्या कामात हयगय केल्याचा ठपका ठेवत लाईनस्टाफमधील २४ कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी महिन्यातील वेतनात कपात करण्याची कारवाई महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. मासिक देय वेतनाच्या २५ टक्के रक्कम दंडात्मक रक्कम म्हणून कपात करण्यात आली आहे. गत महीन्यातही काही कर्मचाऱ्यांना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी असा दणका दिला होता.