लोक काळजी घेतील, महाेदय तुम्हीही घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:33 AM2021-04-27T04:33:03+5:302021-04-27T04:33:03+5:30
उस्मानाबाद : पालकमंत्री गडाख दोनवेळा कोरोना संक्रमित झालेले आहेत. तरीही उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर गेल्या आठवडाभरात दोनवेळा ...
उस्मानाबाद : पालकमंत्री गडाख दोनवेळा कोरोना संक्रमित झालेले आहेत. तरीही उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर गेल्या आठवडाभरात दोनवेळा त्यांनी आढावा बैठका घेतल्या. मात्र, लोकांना काळजी घ्या, असे सांगणारी यंत्रणाच या बैठकांमध्ये सुरक्षित अंतराची काळजी घेताना दिसून आली नाही. त्यांना जशी लोकांची काळजी आहे, तशी ती लोकांनाही यांची आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे व संक्रमित रुग्णांच्या मृत्यूचे आकडे भराभर वाढत होते. अशावेळी पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकत नाहीत, अशी ओरड सुरू झाली होती. मात्र, ते बाधित असल्याने येऊ शकले नाहीत. तरीही ऑनलाईन पद्धतीने आढावा घेत असल्याचे स्पष्टीकरण तेव्हा देण्यात आले. दरम्यान, आजारातून बरे होताच त्यांनी आठवडाभरापूर्वी आढावा बैठक घेतली. यानंतर पुन्हा सोमवारी ते जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांनी भूम, उस्मानाबाद येथील कोविड सेंटर, कोविड सुविधा केंद्र आदींची पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठका घेतल्या. खरीप हंगाम पूर्वतयारी व कोरोना स्थितीबाबतच्या या बैठका होत्या. त्यास (नेहमीप्रमाणे) जिल्ह्यातील भूम-पंरड्याचे आमदार महोदय वगळता इतर सर्वच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. अधिकाऱ्यांचा ताफाही होता. मात्र, जागा अपुरी असल्याने येथे नेहमीप्रमाणे गर्दी झालीच. बंदिस्त खोलीत सुरक्षित अंतर न राखता बैठका झाल्या. पाठीमागे पी.ए. लोकांची लगबग सुरू होती. मध्येच त्यांचे आत-बाहेर येणे, जाणे सुरू होते, तर हॉलच्या बाहेरच सुरक्षेसाठी आलेले पोलीस कर्मचारीही दाटीवाटीने बसलेले दिसले. त्यांनाही सुरक्षित अंतर ठेवून बसण्याची सोयही नव्हती. ही बाब कोरोना संसर्गाला आमंत्रण देणारी ठरते आहे.
बैठका आवश्यकच, पण काळजी हवी...
सध्या जिल्हा ज्या परिस्थितीतून जात आहे, अशावेळी लोकप्रतिनिधींची प्रशासनावर पकड हवीच. वेळोवेळी स्थितीचा आढावा घेणेही आवश्यकच आहे. त्यामुळे बैठका अनिवार्य ठरतात. मात्र, याठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यायलाच हवी. कारण, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना जशी लोकांची काळजी आहे, तडफ आहे, तशी ती यांच्याबद्दल लोकांनाही असणारच. कारण, अशा आणीबाणीच्या प्रसंगी या दोन घटकांशिवाय सर्वसामान्यांना दिलासा देणारी दुसरी कुठली यंत्रणा आहे? आपण आजारी पडल्यास लोक कोणाकडे पाहणार? कोणाकडून अपेक्षा ठेवणार? त्यामुळे आपली नितांत गरज असल्याने सुरक्षित अंतराच्या उपदेशाचे डोस यंत्रणेने स्वत:ही घेणे आवश्यक आहे.