बीडमध्ये पिकअपने नियम माेडला, चालान उस्मानाबादेतील कारमालकाच्या नावे फाटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 07:16 PM2021-01-08T19:16:52+5:302021-01-08T19:17:19+5:30
एखाद्या वाहनाने नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनधारकाच्या नावे दंडाचे चालान फाडल्याचा संदेश जाताे.
उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांच्या नावे आता ऑनलाइन पद्धतीने दंडाचे चालान फाडले जात आहे; परंतु या प्रक्रियेतील अफलातून प्रकार आता समाेर येऊ लागले आहेत. एका पिकअप चालकाने बीडमध्ये नियमांची पायमल्ली केली अन् दंडाचा संदेश मात्र, उस्मानाबादेतील एका कारधारकाला आला आहे. विशेष म्हणजे, ही कार २५ डिसेंबर राेजी गेटच्या बाहेरही काढली नव्हती. यानंतर ते येथील वाहतूक शाखेकडे गेले असता, ‘तुम्ही बीडमध्ये जाऊन दंड रद्द करून घ्या’ असा सल्ला दिला, हे विशेष.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहने दामटणाऱ्या चालकांना वेसण घालण्यासाठी पूर्वी वाहतूक शाखेकडून मॅन्युअली दंडाच्या पावत्या दिल्या जात हाेत्या. मात्र, ही प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. एखाद्या वाहनाने नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनधारकाच्या नावे दंडाचे चालान फाडल्याचा संदेश जाताे. हा दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत असते. या पद्धतीमुळे पारदर्शकता आली असली तरी अनेक अफलातून प्रकार समाेर येत आहेत.
बीड जिल्ह्यात एका पिकअप चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे दंडाचा संदेशही पिकअप चालकाच्या नावेच जाणे आवश्यक हाेते; परंतु ताे मेसेज आला उस्मानाबाद येथील एका कारधारकाच्या नावे. हा संदेश आल्यानंतर कारचालक चक्रावून गेले. कारण २५ डिसेंबर राेजी संबंधित कार घराच्या गेटबाहेरही काढली नव्हती. त्यामुळे कारधारक पारवे यांनी येथील वाहतूक शाखेशी संपर्क केला असता, ‘आम्ही काहीच करू शकत नाही. बीड येथून चालान बनले आहे. परिणामी, तेथून ते रद्द करावे लागेल,’ असा सल्ला दिला. त्यामुळे संबंधित कारधारक पारवे यांना बीड येथे जाऊन दंड रद्द करून घ्यावा लागणार आहे. एकूणच या सर्व प्रकरणात कारधारकास नाहक त्रासाला सामाेरे जावे लागत आहे.