संमेलनात आढळली पायरेटेड पुस्तके
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 04:19 AM2020-01-11T04:19:39+5:302020-01-11T04:19:43+5:30
साहित्य संमेलनात कचोरी आणि वडापाव स्टॉलवर पायरेटेड पुस्तके आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला.
स्नेहा मोरे
उस्मानाबाद : येथील साहित्य संमेलनात कचोरी आणि वडापाव स्टॉलवर पायरेटेड पुस्तके आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला. प्रकाशक सुदेश हिंगलासपूरकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला. हिंगलासपूरकर नाश्ता करण्यासाठी बाहेर पडले असता, कचोरीच्या स्टॉलच्या बाजूला पायरेटेड पुस्तकांची विक्री सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते म्हणाले, अजून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झालेले नाही. त्याआधीच कचोरी आणि वडा पावच्या स्टॉलच्या बाजूला ‘आमचा बाप आणि आम्ही’ आणि ‘कोल्हाट्याचे पोर’ ही पायरेटेड पुस्तके आढळून आली. याबरोबरच अनेक नामवंत लेखकांची पुस्तके येथे उपलब्ध होती. ‘कोल्हाट्याचे पोर’ची छापील किंमत १२५ रुपये आहे. मात्र, पायरेटेड पुस्तक १५० रुपयांना विकले जात होते. ‘आमचा बाप आणि आम्ही’ ही छापील किंमत १५० रुपये असून, पायरेटेड पुस्तकावर २५० रुपये किंमत टाकण्यात आली आहे.
सरकारने कडक कायदा करून बंदी आणावी. आम्ही संयोजकांकडे तक्रार केली आहे, असेही हिंगलासपूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, ही पुस्तके मी रद्दीतून विकत घेतली, असे विक्रेत्याने सांगितले. मात्र, अशी नवीकोरी पुस्तके रद्दीत कशी विकली जातील, असा सवाल हिंगलासपूरकर यांनी उपस्थित केला. संयोजकांकडे तक्रार केल्यानंतर पुस्तके जप्त करून संबंधित विक्रेत्यास बाहेर काढण्यात आले.
।मराठवाड्यात आठ विक्रेते; पायरसी गुन्हा
मराठवाड्यात पायरेटेड पुस्तकांचा व्यवहार करणारे ८ विक्रेते आहेत. अनेक जुन्या पुस्तकांना वाचकांकडून आजही चांगली मागणी आहे. ‘बलुतं’ या पुस्तकाला ४० वर्षांनंतरही मागणी आहे. याचा फायदा घेऊन पायरसीचे प्रकार घडत आहेत. संमेलनातच असे प्रकार होणे पूर्ण चुकीचे आहे. आम्ही प्रकाशक संमेलनात आधीच पुस्तकांवर सवलत जाहीर करीत असतो. गैरव्यवहार करणारे विक्रेते जास्त किंमत लावून वाचकांची फसवणूक करीत आहेत. पायरसी हा गुन्हा आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, असे प्रकाशक सुदेश हिंगलासपूरकर म्हणाले.