नियोजित बालविवाह प्रशासनाने रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:28+5:302021-06-30T04:21:28+5:30
सोमवारी पहाटेच्या मुहूर्तावर १३ वर्षीय मुलीचा बालविवाह तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील जळकोट वाडी येथे होणार असल्याची माहिती ...
सोमवारी पहाटेच्या मुहूर्तावर १३ वर्षीय मुलीचा बालविवाह तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील जळकोट वाडी येथे होणार असल्याची माहिती उमरगा येथील जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना रविवारी सायंकाळी समजली. यावर बिद्री यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले आणि उमरगा तहसीलदार संजय पवार यांना ही माहिती कळविली. दरम्यान, रविवारी सायंकाळी पावसाने जोर धरला होता, परंतु सदर नियोजित बालविवाह हा पहाटे होणार असल्याने रात्रीच संबंधित परिवाराचा शोध घेऊन त्यांचे मनपरिवर्तन करीत बालविवाह रोखणे आवश्यक होते. त्यामुळे नळदुर्ग पोलिसांनी तातडीने या परिवाराचा शोध घेतला. यावेळी पोलिसांनी संबंधित परिवारातील मुलीच्या आई-वडिलांचे समुपदेशन करून, लेखी हमीपत्र घेतले. नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राऊत, सपोनि. एस.बी. मोटे, अंमलदार डी.ए. वाघमारे, बी. अंमलदार मन्मथ पवार आदी अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.