राज्यातील भाजप नेत्यांमुळे माेदींना महाराष्ट्रात तळ ठाेकावा लागताेय: मनाेज जरांगे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 04:59 PM2024-04-30T16:59:26+5:302024-04-30T17:01:09+5:30
लाेकसभेच्या ८८ जागा असलेल्या राज्यात एका टप्प्यात निवडणूक हाेत आहे. मात्र, ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक घ्यावी लागली.
धाराशिव : मराठा समाज भाजपाच्या विराेधात कधीच नव्हता. विराेधात असता तर १०५ जागा उगीच निवडून आल्या का? राज्यातील स्थानिक नेत्यांच्या मराठा द्वेषामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना महाराष्ट्रात तळ ठाेकावा लागताेय, असे मत मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांनी मांडले.
नारायणगड येथे हाेणाऱ्या मराठा समाजाच्या महासभेच्या प्रचाररथाच्या उद्घाटनासाठी ते साेमवारी सायंकाळी धाराशिव शहरात आले हाेते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी मराठा समाजाने पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.
जरांगे-पाटील म्हणाले, लाेकसभेच्या ८८ जागा असलेल्या राज्यात एका टप्प्यात निवडणूक हाेत आहे. मात्र, ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक घ्यावी लागली. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते मराठ्यांचा द्वेष करतात. त्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना राज्यात तळ ठाेकावा लागताेय. इतक्या सभा घ्याव्या लागताहेत. लाेकसभेच्या प्रचारासाठी इतका वेळ माेदी यांनी महाराष्ट्रासाठी कधी दिला नव्हता. मराठ्यांच्या एकजुटीला घाबरून ही वेळ आली आहे. इथेच मराठे जिंकले आहेत.
यानंतरही सगेसाेयरे व मराठा-कुणबी एकच असल्याचा आदेश पारित केला नाही तर यापेक्षाही जास्त वाईट वेळ येईल, असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजाने भाजपाला सत्ता दिली. मात्र, याच सत्तेत आमच्या आई-बहिणीचे डाेके फाेडले गेले. गुन्हे नाेंदविणे सुरूच आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर विधानसभा ताकदीने लढविणार आहाेत. महिनाभरापूर्वीच तशी तयारीही सुरू केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. यावेळी मराठा बांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.