पोलिसांनी प्रवासी बनून बनावट ई-पास बनविणारी टोळी आणली उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 05:50 PM2021-05-19T17:50:44+5:302021-05-19T17:52:09+5:30

उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात ई-पासचे नियमन माहिती तंत्रज्ञान कक्षामार्फत सुरु आहे.

Police arrested a gang for making fake e-passes in Usmanabad | पोलिसांनी प्रवासी बनून बनावट ई-पास बनविणारी टोळी आणली उघडकीस

पोलिसांनी प्रवासी बनून बनावट ई-पास बनविणारी टोळी आणली उघडकीस

googlenewsNext

उस्मानाबाद/कळंब : परजिल्ह्यात प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेला ई-पास बनवून देण्याऱ्या उस्मानाबादेतील टोळीचा छडा मंगळवारी पोलिसांनी लावला आहे. पोलिसांनी स्वत: ग्राहक बनून हा पास मिळवीत बनवेगिरी करण्यांचे बिंग फोडले अन् तिघांना लागलीच गजाआडही पाठविले.

उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात ई-पासचे नियमन माहिती तंत्रज्ञान कक्षामार्फत सुरु आहे. या कक्षात कार्यरत अमोल निंबाळकर यांना जिल्ह्यात १ हजार २०० रुपये घेऊन बनावट पास वितरीत केले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी तातडीने एक पथक गठित करुन आरोपींचा छडा लावण्याची सूचना केली. त्यानुसार कर्मचारी अमोल गणेश यांनी कारचालक असल्याचे सांगून पास मिळवून देणाऱ्या कन्हेरवाडी येथील एमएससीआयटी प्रशिक्षण केंद्राचा श्रीकांत शिवाजी कवडे यांना संपर्क साधला. पुण्याला प्रवासी घेऊन जायचे असल्याचे सांगून पासची मागणी केली. त्या वेळी आरोपी श्रीकांत कवडे याने गणेश यांच्याकडून ओळखपत्र व आवश्यक माहिती व्हाट्सॲपद्वारे घेउन ई-पास पोटी १ हजार २०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले. 

अमोल गणेश यांनी त्यानुसार पैसे जमा केले. रात्री ९ वाजेपूर्वीच अमोल गणेश यांच्या व्हाट्सॲपवर ई-पास प्राप्त झाला. पोलीस पथकाने त्या पासची तुलना पोलीस दलाच्या अधिकृत पास सोबत केली असता तो ई-पास बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पथकाने तात्काळ कळंब परिसरातून कवडे यास ताब्यात घेतले. दरम्यान, त्याने या पासचे वितरण उस्मानाबाद येथील महादेव दत्तु राजगुरु हा करीत असल्याचे सांगताच पथकाने राजगुरु यासही ताब्यात घेतले. राजगुरु याने सांजा रोड परिसरात राहणाऱ्या विजय भागवत सिरसाटे याच्यामार्फत हे बनावट ई-पास बनवून घेत असल्याचे सांगितल्याने सिरसाटे यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ड नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Police arrested a gang for making fake e-passes in Usmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.