उस्मानाबादेत लाचेची मागणी करणाऱ्या दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 03:29 PM2019-03-16T15:29:04+5:302019-03-16T15:29:31+5:30
‘लाचलुचपत’चे पोलीस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे, पोलीस निरीक्षक विनय बहीर यांनी सदरील तक्रारीची शहानिशा केली असता, तथ्य आढळून आले.
उस्मानाबाद : अदखलपात्र गुन्ह्यातील गैर अर्जदाराविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाईसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस उपनिरीक्षक अशा दोन बड्या अधिकाऱ्यांविरूद्ध शनिवारी ढोकी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दल हादरले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील गैर अर्जदाराविरूद्ध कडक प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी ढोकी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणपत जाधव व सहायक पोलीस उपनिरीक्षक जोतीराम कवठे यांच्याकडे तक्रारदार यांनी केली होती.
दरम्यान, गैर अर्जदाराविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाईसाठी सपोनि. जाधव यांनी ४० हजार तर सपोउपनि. कवठे यांनी २ हजार रूपये लाचेची मागणी केली, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली होती. ‘लाचलुचपत’चे पोलीस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे, पोलीस निरीक्षक विनय बहीर यांनी सदरील तक्रारीची शहानिशा केली असता, तथ्य आढळून आले. यानंतर १६ मार्च रोजी उपरोक्त दोन्ही अधिकाऱ्यांविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) अंतर्गत ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील प्रकरणाचा अधिक तपास पोनि. विनय बहीर हे करीत आहेत. ‘लाचलुचपत’च्या या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.