बनावट नोटा प्रकरणात कळंब येथील युवकास पोलिसांनी उचलले; मोठे रॅकेट असल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 07:48 PM2021-04-03T19:48:52+5:302021-04-03T19:50:18+5:30
कळंब शहरातील बाबानगर भागातील एकजण बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
कळंब (जि. उस्मानाबाद) -कळंब शहरातील बाबा नगर भागातील एका युवकास बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी कळंब पोलिसांनी जेरबंद केल्याने खळबळ उडाली आहे. या पाठीमागे मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय असून आणखी काहीजण या रॅकेटमध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे.
कळंब शहरातील बाबानगर भागातील एकजण बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी पोलीस कर्मचारी सुनिल कोळेकर, सुनिल हांगे, शिवाजी राऊत, अमोल जाधव, महिला पोलीस रेखा काळे यांच्या पथकाला याप्रकरणी तपासासाठी नियुक्त केले होते.
या पथकाने शुक्रवारी शहरातील बाबा नगर भागातील असद ताहीरअली सय्यद (वय २४) यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे ५०० रूपयांच्या २ व २०० रुपयांच्या ५ बनावट नोटा आढळून आल्या. त्या नोटांचा पंचांसमक्ष पंचनामा करून पथकाने पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद याच्या बाबानगर भागातील घराची झडाती घेतली असता घरातील कपाटाशेजारच्या भिंतीच्या चिरीमध्ये ५०० रुपयांच्या आणखी २ बनावट नोटा सापडल्या. याप्रकरणी असद सय्यद याच्यावर बनावट नोटा बाळगल्या, त्या चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी शिवाजी राऊत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे करीत आहेत.
सय्यद हा या नोटा चलनात आणत होता. परंतु, त्याला या बनावट नोटा कोण पुरवित होते? यामागे कोणती टोळी कार्यरत आहे? शहरातील आणखी काही मंडळी या टोळीमध्ये सहभागी आहे का? आदी बाबींचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान शहरात बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी एका युवकास पकडल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.