कार पलटी झाल्याने पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू, चार मुलांसह कुटुंबातील 5 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 04:50 PM2022-05-16T16:50:35+5:302022-05-16T18:10:26+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा ते पाटोदा रस्त्यावरील करजखेडा गावाजवळ हा भीषण अपघात झाला.
लोहारा(उस्मानाबाद ): लोहारा ते पाटोदा रस्त्यावरील करजखेडा गावाजवळ बोलेनो कार पलटी झाल्याने कळंब तालुक्यातील डिसकळच्या पोलीस पाटीलांचा जागेवरच मृत्यू झाला. तर या घटनेत कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. यात लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांच्यावर लोहारा शहरातील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास घडली आहे.
कळंब तालुक्यातील डिसकळ येथील पोलीस पाटील ज्ञानेश दीक्षित यांची सासरवाडी लोहारा आहे. ते आपल्या कुटुंबासह येथे आले होते. दोन दिवसाच्या मुक्कामानंतर ते आपल्या कुटंबासह सोमवारी सकाळी साडे सात वाजता बोलेनो कारने (एम एच २५-एएल ४२५४) गावी डिकसळकडे निघाले होते. दरम्यान, लोहारा-पाटोदा रस्त्यावरील उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा गावाजवळ समोरच्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात कार पलटी झाली. त्यात ज्ञानेश दीक्षित ( वय ४२) यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी शीतल दीक्षित,मुले प्राजक्ता दीक्षित, अवधूत दीक्षित, स्वानंद पंडित, कृष्णा पोतदार हे पाचजण जखमी झाले. त्यांना लोहारा शहरातील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
लोहारा ते पाटोदा रस्त्याचे सद्या काम सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूचे डांबरीकरण झाले आहे. दुसऱ्या बाजूचे काम झाले नाही. त्यामुळे डांबरी रस्त्यावरून वाहने चालवली जातात. मयत दीक्षित हे आपल्या कारने जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात त्यांची कार तीन वेळा पलटी झाली. कार पलटी होताना दीक्षित गाडीच्या बाहेर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी, मुले व मेहुण्याचे दोन मुले गाडीत अडकली होती. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढून लोहारा शहरातील ग्रामिण रूग्णालयात दाखल केले.