तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे पॉलिटिकल कनेक्शन, भाजपचे माजी नगराध्यक्ष-उपसभापती गोत्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:56 IST2025-03-26T13:22:46+5:302025-03-26T13:56:33+5:30
तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणाची पाळेमुळे चांगलीच घट्ट रुजल्याचे आता तपासातून समोर येऊ लागले आहे.

तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे पॉलिटिकल कनेक्शन, भाजपचे माजी नगराध्यक्ष-उपसभापती गोत्यात
तामलवाडी (जि. धाराशिव) : तुळजापूर येथील ड्रग्स तस्करांची व यात गुंतलेल्यांची यादी लांबतच चालली आहे. मंगळवारी पोलिसांनी न्यायालयात आणखी सहा जणांची नावे उघड केली आहेत. यामध्ये तुळजापूरचे एक माजी नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष पती व पंचायत समितीच्या एका माजी उपसभापतीचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, हे पदाधिकारी भाजपशी संबंधित आहेत.
तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणाची पाळेमुळे चांगलीच घट्ट रुजल्याचे आता तपासातून समोर येऊ लागले आहे. विशेष म्हणजे यात राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीही यात गुंतल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपाधीक्षक निलेश देशमुख तसेच तपास अधिकारी गोकूळ ठाकूर यांनी तपासाला गती देत आतापर्यंत १९ आरोपी निष्पन्न केले होते. त्यात मंगळवारी पुन्हा ६ नवीन नावांची भर पडली आहे. या प्रकरणात तीन वेळा ड्रग्स पकडण्यात आले असून, सोमवारी रात्री उशिरा पकडलेल्या सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा राहूल कदम-परमेश्वरसह १३ आरोपी कोठडीत आहेत. वैभव गोळे व स्वराज उर्फ पिनू तेलंग हे दोघे फरार आहेत. दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी या यादीत आणखी काही नावे उघड करुन त्यांचा शोध सुरु असल्याचे सांगितले आहे. या नव्या यादीत तीन बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
...यांना करण्यात आले आरोपी
मंगळवारी पोलिसांनी न्यायालयासमोर उघड केलेल्या आरोपींच्या नावात माजी नगराध्यक्ष पती विनोद उर्फ पिटू गंगणे, चंद्रकांत (बापू) कणे, माजी उपसभापती शरद जमदाडे यांच्यासह इंद्रजीतसिंग ठाकूर, प्रसाद उर्फ गोठन कदम, उदय शेटे, गजानन प्रदीप हंगरकर, आबासाहेब पवार, आलोक शिंदे, अभिजीत गव्हाड असे १० व यापूर्वीचे दोन असे एकूण १२ आरोपी सध्या फरार आहेत.
असे आहे पॉलिटिकल कनेक्शन
सध्या कोठडीत असलेला आरोपी विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हा भाजपच्या माजी सभापतींचा मुलगा आहे. तर माजी नगराध्यक्ष पती विनोद गंगणे, माजी उपसभापती शरद जमदाडे हे हेही भाजपशी संबंधित आहेत. माजी नगराध्यक्ष बापू कणे हे दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत भाजपसोबत सक्रीय होते. विशेष म्हणजे, हे राजकीय पदाधिकारी यापूर्वी काँग्रेस व अविभक्त राष्ट्रवादीकडून निवडून आलेले होते. नजीकच्या काळात त्यांनी भाजपात उडी घेतली होती.