उस्मानाबादेत राजकीय भूकंपाचा मुहूर्त ठरला;रविवारी महाजनादेश यात्रेत राणा पाटलांचा भाजप प्रवेश ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 07:19 PM2019-08-29T19:19:55+5:302019-08-29T19:24:00+5:30
माजी मंत्री राणा पाटील भाजपच्या वाटेवर
उस्मानाबाद : मराठवाड्यातील बहुचर्चित पक्षांतर मूर्त स्वरुप घेण्याच्या मार्गावर आहे़ शरद पवारांचे खंदे समर्थक डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव माजी मंत्री आ़राणा पाटील हे भाजपच्या वाटेवर असून, रविवारी उस्मानाबादेत दाखल होत असलेल्या महाजनादेश यात्रेत त्यांचा प्रवेश नक्की मानला जात आहे़
गेल्या महिनाभरापासून राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरु आहे़ मात्र, त्यांनी दोनवेळा या चर्चेचे खंडन केले होते़ लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा नसतानाही त्यांना शरद पवारांच्या आग्रहाखातर ही निवडणूक लढवावी लागली होती़ ज्यात ते मोठ्या फरकाने पराभूत झाले होते़ सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेत त्यांनी वेगळा मार्ग निवडण्याचे निश्चित केल्याचे दिसते़ गुरुवारी सायंकाळी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन प्रसारित झालेला एक संदेश कार्यकर्त्यांना पक्षांतराचाच संदेश देऊन गेला़ ‘मला तुमच्याशी काही बोलायचंय’ अशा मथळ्याखाली त्यांनी कार्यकर्त्यांना ३१ आॅगस्ट रोजी उस्मानाबाद येथे संवाद साधण्यासाठी निमंत्रित केले आहे़ सोबतच त्यांनी दीर्घ अशी पोस्टही लिहिली आहे़ त्यातून भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे़ ‘आजवर जी मायेची उब आणि सक्षम साथ आपण सर्वांनी दिली, यापुढेही ती अशीच राहील, असा माझा दृढ विश्वास आहे़़़ प्रामाणिक कामासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात़़़बदलत्या नैसर्गिक, भौगोलिक व राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या निरंतर विकासासाठी काही निर्णय घेणे अपेक्षित आहेत़़़’ असे सांगत राणा पाटील यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे सूचक संकेत दिले आहेत़ विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा १ सप्टेंबर रोजी उस्मानाबादेत दाखल होत आहे़ त्याच्या एक दिवस आधीच म्हणजेच ३१ आॅगस्ट रोजी निर्णय घेण्यासंदर्भात राणा पाटील यांनी जाहीर संवाद आयोजित केला आहे़ त्यामुळे ते महाजनादेश यात्रेतच भाजप प्रवेश करु शकतात, अशी अटकळ आहे़ तसे झाल्यास राष्ट्रवादीसाठी हा फार मोठा धक्का असणार आहे़
पवार कुटूंबियांशी रक्ताचे नाते़़़
माजी गृहमंत्री डॉ़पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य असून, पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात़ शिवाय, त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध आहेत़ माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार हे डॉ़पाटील यांचे सख्खे मेहुणे आहेत़ आजघडीला राष्ट्रवादीतून अनेक नेते भाजप-सेनेत उड्या मारत असले तरी, राणा पाटलांचे पक्षांतर हे पवार कुटूंबियांच्या जिव्हारी लागणारे आहे़