गंजेवाडी-तामलवाडी रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:39 AM2021-09-09T04:39:29+5:302021-09-09T04:39:29+5:30

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी ते तामलवाडी हा पाच किलोमीटर लांबीचा रस्ता गेल्या पाच वर्षांपासून नादुरुस्त आहे. त्यामुळे नागरिकांना ...

Poor condition of Ganjewadi-Tamalwadi road | गंजेवाडी-तामलवाडी रस्त्याची दुरवस्था

गंजेवाडी-तामलवाडी रस्त्याची दुरवस्था

googlenewsNext

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी ते तामलवाडी हा पाच किलोमीटर लांबीचा रस्ता गेल्या पाच वर्षांपासून नादुरुस्त आहे. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यातूनच वाट शोधत प्रवास करावा लागत असून, खराब रस्त्यामुळे येथील बससेवाही बंद पडली आहे.

तामलवाडीपासून पाच किलोमीटर अंतरावर गंजेवाडी हे अडीच हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावाला जोडणारा रस्ता पाच वर्षांपासून नादुरुस्त असून, पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचत असल्याने विशेषत: दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. येथील विद्यार्थी शिक्षणासाठी तामलवाडी येथे सायकलीवरून ये-जा करतात. त्यामुळे या नादुरुस्त रस्त्याचा विद्यार्थ्यांनादेखील मोठा त्रास होत आहे. दोन वर्षांपूर्वी मध्यभागी एक किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, उर्वरित चार किलोमीटर रस्ता जशास तसे खड्डेमय आहे.

नादुरुस्त रस्त्यांमुळे रोज येणारी राज्य परिवहन महामंडळाची बस पाच वर्षांपासून बंद आहे. या संदर्भात बांधकाम सभापती धनंजय सावंत यांच्याकडेही ग्रामस्थांनी गंजेवाडी रस्त्याचे गाऱ्हाणे मांडले होते. शिवाय, खुद्द खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही भेट देऊन या रस्त्याची पाहणी केली. तसेच लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वसन दिले आहे. परंतु, अद्याप कुठलीच कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.

चौकट

लवकरच प्रश्न मार्गी लागणार

अनेक वर्षांपासून तामलवाडी ते गंजेवाडी या पाच कि.मी. रस्त्याचे भिजत घोंगडे कायम आहे. याच्या दुरुस्तीसाठी आता खासदार राजेनिंबाळकर यांनी लक्ष घातले आहे. गाव भेटीदरम्यान गावकऱ्यांनी ही समस्या मांडल्यानंतर निधी आणि मंजुरी घेऊन ते काम चालू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे हे काम लवकरच मार्गी लागेल, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी दिली.

Web Title: Poor condition of Ganjewadi-Tamalwadi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.