विश्रामगृहाची दुरवस्था, वाहक-चालकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:28 AM2021-03-14T04:28:33+5:302021-03-14T04:28:33+5:30
उस्मानाबाद शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात बसेस धावत असतात. चालक-वाहकांवरच एसटीची सेवा अवलंबून असते. त्यामुळे ...
उस्मानाबाद शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात बसेस धावत असतात. चालक-वाहकांवरच एसटीची सेवा अवलंबून असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना काही क्षण विश्रांती घेता यावी, तसेच लांब पल्ल्याच्या वाहक-चालकांना झोपण्याची सोय व्हावी, यासाठी मध्यवर्ती बस स्थानकालगत विश्रामगृहाची इमारत उभारण्यात आली आहे. या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यासह औरंगाबाद, कराड या लांब पल्ल्याच्या बस गाड्यांवरील वाहक-चालक आराम करण्यासाठी थांबत असतात. रात्रीच्या वेळी उस्मानाबाद बस आगारात इतर तालुक्यांच्या तुलनेत जास्त चालक-वाहक मुक्कामी असतात. विश्रामगृहाच्या केवळ दोन खोल्या आहेत. त्यामुळे अनेकदा रात्रीच्या वेळी चालक-वाहकांची गर्दी वाढल्यास अनेकांना जागाच मिळत नाही. त्यासाठी विश्रामगृहातील खोल्यांची संख्या वाढवायला हवी, असे मत उस्मानाबाद आगारातील काही चालकांनी व्यक्त केले. लांब पल्ल्याच्या वाहक-चालकांसाठी कोटची सोय करण्यात आलेली आहे. या खोलीतील दोन पैकी एकच पंखा सुरू आहे. जिल्ह्यातील आगाराच्या वाहक-चालकांसाठी एक खोली आहे. या खोलीतील फरशा फुटलेल्या आहेत, तसेच खिडक्यांच्या जाळ्या तुटलेल्या आहेत, शिवाय विश्रामगृहातील शौचालयांची साफसफाई केली जात नाही. यामुळे या शौचालयांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. परिणामी, डासांचा उच्छाद वाढला आहे. रात्री मुक्कामी असलेल्या चालक-वाहकांना यामुळे आपली रात्र जागूनच काढावी लागते. एसटी प्रशासनाने सोईसुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही वाहक चालकांतून होत आहे.
चौकट...
वराहाचा मुक्त संचार
बस स्थानकातील विश्रामगृहाच्या इमारतीच्या परिरात वराहाराचा मुक्त संचार असल्याचे आढळून येते. विश्रामगृहाच्या खोल्यांचा दरवाजा उघडा असल्यास, वराह थेट आतमध्येही प्रवेश करीत असतात.
स्वच्छतागृहांची सफाई नाही
लांब पल्ल्याच्या बसगाड्यावरील वाहक-चालकांना विश्रांती घेता यावी, यासाठी विश्रामगृहाची इमारत बांधण्यात आली असली, तरी या इमारतीलगत बांधण्यात आलेले स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली आहे. अनेक स्वच्छतागृहाची दरवाजे मोडले आहेत, तर त्याची स्वच्छताही केली जात नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असते. परिणामी, वाहक-चालक मध्यवर्ती बस स्थानकातील स्वच्छतागृहाचा वापर करीत असतात.
प्रतिक्रिया...
विश्रामगृहाच्या इमारतीतील स्वच्छतागृह वापरण्यायोग्य नाहीत. पिण्याच्या पाण्याचीही सोय इमारतीत नसल्याने पाणी विकत घ्यावे लागते, शिवाय स्वच्छता कर्मचारी नसल्याने वाहक-चालक साफसफाई करून करून घेतात.
-तनवीर खान, चालक
विश्रामगृहाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे डासाेत्पत्तीही वाढली, वराहाचा वावर असतो. इमारत परिसरातील साफसफाई केली जात नसल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.
-आर.पी. सुरवसे, वाहक