राज्य रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:35 AM2021-08-27T04:35:02+5:302021-08-27T04:35:02+5:30
ईट : भूम तालुक्यातील ईट-जातेगाव या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारित असलेल्या राज्य रस्त्यावर येथील मुख्य चौकात नागेवाडी चौकाजवळ या ...
ईट : भूम तालुक्यातील ईट-जातेगाव या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारित असलेल्या राज्य रस्त्यावर येथील मुख्य चौकात नागेवाडी चौकाजवळ या आठवड्यात झालेल्या पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या या खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने डबक्याचे स्वरूप आले असून, यातून वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
नागेवाडी चौकाच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटर अंतरापर्यंत या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. हा रस्ता गावच्या मुख्य बाजारपेठेत असल्याने गावातील व्यापाऱ्यांनाही या खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये दोन वेळा या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले. दोन महिन्यापूर्वीच खड्डे बुजवण्याचे पूर्ण झाले होते. परंतु, हे काम व्यवस्थित न झाल्याने अवघ्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. तसेच भूम-जातेगाव या रस्त्यावर घाटनांदूर शिवार, सुकटा परिसरातील रस्ता याठिकाणीही जागोजागी खड्डे पडल्याचे दिसते. दरम्यान, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याकडे विचारणा केली असता या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला असून, थोड्या दिवसांमध्ये मजबुतीकरण, डांबरीकरण व रूंदीकरणाचे तसेच काही ठिकाणी सिमेंट रस्त्याचेही काम होणार असल्याचे ते म्हणाले.